राष्ट्रवादीला बीडमध्ये धक्का; एका उमेदवाराचा भाजपात प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसला बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे.
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसला बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ सहकारी कारखाना येथे पक्षप्रवेश करण्यात आला आहे.
नमिता मुंदडा यांना भाजपाने केजमधून उमेदवारी निश्चित केली होती. तर विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांचे तिकीट कापले.
शरद पवार यांची नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांच्यावर चांगलीच मर्जी होती. मात्र केवळ सत्तेसाठी त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीकडून नमिता मुंदडा यांना केजमधून उमेदवारी मिळाल्यानंतरही त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने आता राष्ट्रवादीपुढे नवा उमेदवार उभा करण्याचे आव्हान असणार आहे.
राज्याच्या माजी आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय विमल मुंदडा यांच्या सुनबाई नमिता मुंदडा यांनी पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या चिन्हावर केज विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी नमिता अक्षय मुंदडा यांच्या फेसबुक पोस्ट वरून शरद पवार आणि राष्ट्रवादीचे चिन्ह गायब झाल्याने त्यांच्या भाजप प्रवेशबद्दल चर्चा सुरू झाली होती. अखेर आज त्यांच्या भाजपा पक्षप्रवेशानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.