विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) चॉकलेटच्या (Chocolate) गोदामात काम करणाऱ्या दोन कामगारांनी तब्बल दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी करून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चॉकलेट चोरी करणाऱ्या दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अंबाजोगाई इथले व्यवसायिक प्रदीप वाघमारे यांच्याकडे चॉकलेटची एजन्सी (Chocolate Agency) असून मोठ्या प्रमाणात त्यांच्या गोदामामध्ये चॉकलेटचा साठा करून ठेवलेला आहे. याच ठिकाणी काम करणारे गणेश सखाराम मुनीम आणि राहुल वैजनाथ पवार या दोघांनी गोडाऊनची डुप्लिकेट चावी तयार केली आणि गेल्या दोन महिन्यापासून दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी करून विक्री केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी राहुल आणि गणेश हे दोघेजण या गोडाऊनमध्ये काम करतात. मात्र गेल्या दोन महिन्यात गोदामातील चॉकलेट कमी होऊन व्यवसायामध्ये तोटा झाल्याचं प्रदीप वाघमारे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गोडाऊन मध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये या गोदामातच काम करणाऱ्या दोन कामगारांनी चॉकलेटची चोरी केल्याचं निदर्शनास आलं.


राहुल आणि गणेश या दोघांनी वारंवार गोदामात चोरी केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवून प्रदीप वाघमारे यांनी रात्री अकराच्या सुमारास गोडाऊनमध्ये चोरी करताना त्या दोघांना रंगे हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल पवार हा पळून जाण्यात यशस्वी झाला असून गणेश मुनीम याला पोलिसांनी अटक केली आहे.