शिक्षक तुम्ही सुध्दा! बदली होऊ नये म्हणून 52 शिक्षकांनी केला मोठा झोल, अशी झाली पोलखोल
विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारे शिक्षकच जेव्हा चुकतात, बीड जिल्ह्यात शिक्षकांनी केला असा कारनामा, निलंबनाची झाली कारवाई
विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : शिक्षक (Teacher) म्हणजे समाज घडविणारा सर्जनशील घटक. विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. राष्ट्रउभारणीत शिक्षण आणि शिक्षकांना महत्त्वाचे स्थान आहे. पण विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्य घडवणारे शिक्षक जर चुकत असतील तर. अशीच एक धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. त्याच शाळेत नोकरी राहावी यासाठी या शिक्षकांनीच झोल केल्याचा समोर आलं आहे.
खोटं प्रमाणपत्र जोडलं
त्याच शाळेत नोकरी राहावी यासाठी बीड जिल्ह्यातील 248 पैकी तब्बल 52 शिक्षकांनी दिव्यांग असल्याचं खोटे प्रमाणपत्र (Fake Disability Certificate) जोडल्याचं समोर आलं आहे. चौकशी नंतर हा बनाव उघड झाला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अजित पवार यांनी या शिक्षकांचं तडकाफडकी निलंबन (Suspension of Teachers) केलं आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकांची विभागीय चौकशीचे आदेश दिले असून चौकशी नंतर त्यांच्यावर दंडात्मक फौजदारी गुन्हा (Criminal Offense) दाखल होणार आहे.
दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र
बीड जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी बदली टाळण्यासाठी (Replacement) बनावट दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र बनवून घेतलं. हे प्रमाणपत्र त्यांनी शासकीय कार्यालयात जमा देखील केलं आणि यातून त्यांनी आपल्याला सोयीचं व्हावं यासाठी शहराजवळील शाळा निवडली. आहे त्याच ठिकाणी राहता यावं यासाठी हे सर्व झोल करण्यात आले. पण बीड शहर आणि इतर शहरांच्या बदलांमध्ये तफावत येत असल्याने प्रशासनाला संशय आला आणि त्यांनी चौकशीचे आदेश दिले. या चौकशीच्या आदेशामध्ये 52 शिक्षकांनी दिव्यांग असल्याची बोगस प्रमाणपत्र बनवून एकाच शाळेवर राहण्यासाठी कुरापत केल्याचं लक्षात आलं. त्यानंतर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
दिव्यांगांच्या सुविधाही लाटल्या
दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या सुविधांसह इतर लाभ देखील या शिक्षकांनी उचलल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे या सर्व शिक्षकांकडून त्यांनी घेतलेले लाभ आणि साधन याची वसुली प्रशासन करणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर पुढील कार्यवाही देखील करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील या 52 शिक्षकांना बनावट दिव्यांगाचे प्रमाणपत्र बनवून शहरांमध्ये नोकरी करणं चांगलंच महागात पडलं आहे.
महाराष्ट्रभरात व्याप्ती असण्याची शक्यता
बीड जिल्ह्यामध्ये 52 शिक्षकांनी बनावट दिव्यांगाचे प्रमाणपत्र बनवून शहरांमध्ये राहता यावं यासाठी जो प्रयत्न केला तसाच प्रयत्न बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात आणि महाराष्ट्रभरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरात अनेक शिक्षक या चौकशीच्या फेऱ्यामध्ये येऊ शकतात. प्रशासनाने बीड जिल्ह्यामध्ये अजून काही शिक्षक असे आहेत का याचा तपास घ्यायला सुरुवात केलेली आहे.