Beed Accident News : बीडमध्ये सुनेच्या डोहाळे जेवणासाठी (Baby Shower) जाणाऱ्या सासऱ्यावर काळाने घातला आहे. नवीन सदस्य येण्याआधीच घरातील महत्त्वाच्या व्यक्तीने एक्झीट घेतल्याने कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. सूनेच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी लवकर पोहोचण्यासाठी तिच्या सासऱ्यांनी समोर गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र हाच प्रयत्न या व्यक्तीच्या जीवावर (Beed Accident News) बेतला आहे. रामदास मिसाळ असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी सकाळी रामदास मिसाळ हे सूनेच्या डोहाळे कार्यक्रमासाठी तिच्या माहेरी निघाले होते. यावेळी बीड - अहमदनगर रस्त्यावरील धानोराजवळ त्यांच्या बाईकला गंभीर अपघात झाला. या गंभीर अपघातात मिसाळ यांना जीव गमवावा लागला आहे. मिसाळ हे जाखमेड येथून अहमदनगरकडे जात होते. यावेळी शिवाशाही बस आणि मिसाळ यांच्या बाईकची समोरासमोर धडक बसली. ही धडक ही भीषण होती की त्यातच मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला.


कसा झाला अपघात?


जामखेडच्या आनंदवाडी येथे रामदास मिसाळ राहत होते. बाईकवरुन रामदास मिसाळ हे  जामखेड येथून अहमदनगरकडे जात होते. यावेळी मिसाळ यांनी बीड-अहमदनगर महामार्गावरील धानोराजवळ समोरील गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.. त्याचवेळी समोरुन पुण्याहून नांदेडला जाणाऱ्या शिवशाही बसला मिसाळ यांची धडक बसली. या गंभीर अपघातात रामदास मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला.


गेल्या चार दिवसांत दोघांचा मृत्यू


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बीड - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने तो जीवघेणा ठरत आहे. गेल्या चार दिवसांत या रस्त्यावर झालेल्या अपघातात आतापर्यंत दोघांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार?


अहमदनगर ते बीड या राष्ट्रीय महामार्ग क्र.561 चे चौपदरीकरण करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी सातत्याने केली होती. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर एकूण 140.775 कि.मी. लांबी असलेल्या या महामार्गासाठी एकूण 1050 कोटी रुपयांची मंजूरी मिळणार असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली होती. यासोबत कामाला लवकर सुरुवात होणार असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली होती.