महादेवाच्या पिंडीखाली सापडलं 700 वर्षापूर्वीचं सोन्याचं कासव; बीड मधील मंदीर परिसरात एकच गर्दी
Beed Golden Tortoise: संपूर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर बीडमधील माजलगाव तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासात येथे मोठी यात्रा भरते. त्यानिमित्तानेच नव्या मंदिराचे बांधकाम सुरु असतानाच हे कासव सापडले आहे.
विष्णु बरगे, झी मीडिया, बीड : भगवान पुरुषोत्तमाच्या (Lord Purushottama) भारतातील एकमेव मंदिरामध्ये आश्चर्यकारक गोष्ट समोर आले आहे. बीडमध्ये (Beed News) गोदावरी नदीच्या काठावर राजा रामदेवराय यांनी उभारलेल्या भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिराच्या बांधकामादरम्यान सोन्याचे कासव सापडलं आहे. या आश्चर्यकारक घटनेनंतर भाविकांनी हे सोन्याचे कासव (gold turtle) पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. नवीन मंदिराच्या बांधकमासाठी भगवान शंकराची पिंड काढत असताना हे कासव आढळून आले आहे. हे कासव जवळपास 1 तोळ्याचे असल्याचे समोर आले आहे. भाविकांनी या कासवाची मनोभावे पूजा केली.
भगवान पुरुषोत्तमाच्या जुन्या मंदिरातील भगवान पुरुषोत्तमाच्या मुर्तीसमोर असलेली महादेवाची पिंड काढत आसतना त्याखाली सोन्याचे कासव सापडले. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे हे पुरातन मंदिर आहे. पुरुषोत्तमपुरी येथील देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे गोदावरी नदीच्या काठावर असलेले हे मंदिर 700 वर्षापूर्वी राजा रामदेवराय यांनी बांधले होते. भगवा पुरुषोत्तमाची अधिकमासा निमित्त महिनाभर जत्रा भरत असते. या दरम्यान, भगवार पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक पुरुषोत्तमपुरी येत असतात.
700 वर्षापूर्वीच्या मंदिराची होणारी पडझड लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली होती. जुन्या मंदिरामुळे भाविकांनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता. भक्तांची गैरसोई लक्षात येताच महाराष्ट्र शासनाच्यावतीने मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी 54 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर केला आहे. विभागीय आयुक्त सुनिल केंन्द्रेकर यांच्या प्रयत्नाने हा निधी मिळाला आहे. टेंडर प्रक्रियेनंतर या मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात अधिकमास सुरु होणार आसल्याने मंदिरातील भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती जुन्या मंदिरातून हालवून दुसरीकडे ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, या मंदिरासमोर असलेली पिंड हलवताच त्याखाली सोन्याचे कासव सापडले. ही माहिती मिळताच गावकऱ्यांसह भाविकांनी सोन्याचे कासव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. महादेवाची पिंड हलवताच त्याखाली असलेल्या खोलगट जागेत हे कासव ठेवण्यात आले होते. हे कासव सातशे वर्षांपूर्वी भगवान शंकराच्या पिंडी खाली ठेवले असल्याचे विश्वस्त विजय गोळेकर यांनी सांगितले आहे. दुसरीकडे नवीन मंदिर उभारणीनंतर पुन्हा त्याच पिंडीखाली हे सोन्याचे कासव ठेवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पौराणिकदृष्ट्या प्रसिध्द असणाऱ्या या मंदीराला निजामशाहीच्या काळात भरघोस मदत देण्यात आली होती. निजामाने या देवस्थानच्या देखरेखीसाठी शेकडो एकर जमीनी दिल्या होत्या. तर अधिकमासात भगवान पुरूषोत्तमाला सोन्याचे, चांदीचे, पुरणाचे, पेठ्याचे धोंडे अर्पण करण्याची प्रथा आहे.