विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : (HSC Exam News) महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना 21 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून, शिक्षण मंडळाकडून कॉपीमुक्त अभियानासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या अभियानाला न जुमानता राज्यात सर्रास कॉपी करण्याच्या घटना घडताना दिसत आहेत. राज्यात अद्यापही कॉपी पुरवण्याचे प्रकार सुरु असून, नुकत्याच सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्येही हे चित्र पाहायला मिळालं. बीडमध्ये (Beed News) हा धक्कादायक प्रकार घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडमधील तेलगाव येथील सरस्वती विद्यालयांमध्ये बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला कॉपी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इथं परीक्षा केंद्र असणाऱ्या महाविद्यालयाच्या इमारतीवर चढून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात आल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालं. इथं कॉपी पुरवण्यासाठी परीक्षा केंद्रांबाहेर मोठी गर्दी दिसली. हा सर्व प्रकार घडत असताना प्रशासन आणि परीक्षा यंत्रणांचं मात्र याकडे अजिबातच लक्ष गेलं नाही ही चिंतेची बाब. 


हेसुद्धा वाचा : खोल समुद्रात सापडलेल्या खजिन्यामुळं अख्खा देश मालामाल; 50 वर्षांनंतरही संपतच नाही साठा... कुठंय हे ठिकाण? 


बारावीच्या परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी सर्वच परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. असं असतानाही सरस्वती महाविद्यालयाच्या पाठीमागच्या परिसरातून जीव धोक्यात घालून भींत ओलांडून अनेकांनीच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचं पाहायला मिळालं. 


दरम्यान, आता प्रशासनाकडून यासंदर्भात नेमकी कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इथं राज्यात कॉपीमुक्त अभियानाला झुगाकून सर्रास गैरप्रकार घडत असतानाच तिथं इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यासाठी कैक आंदोलनं होऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळं कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे.