Beed Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिकच्या काळ्याकुट्ट कारनाम्यांची यादीच जगजाहीर झाली आहे. हाणामारी, खंडणीपासून खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे वाल्मिकवर दाखल आहेत. 1999 ते 2024 या 25 वर्षांच्या काळात बीडमध्ये एकट्या वाल्मिक कराडविरोधात तब्बल 15 गुन्हे दाखल आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे गुन्हेगारी जगतातील क्रूर चेहरा वाल्मिकच्या रुपाने समोर आला असला तरी त्याच्या गुन्ह्यांची कुंडली हादरूवन टाकणारी आहे. बीडच्या परळीत वाल्मिक कराडविरोधात सर्वाधिक म्हणजेच 10 गुन्हे दाखल आहेत.


वाल्मिक कराड विरोधात कोणते गुन्हे दाखल आहेत? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परळीत वाल्मिकविरोधात 10 गुन्हे दाखल आहेत. 


1. परळी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा जमाव गोळा करणे व मारामारीचे 4 गुन्हे आहेत. 
2. खुनाचा प्रयत्न केल्याचा 1 गुन्हा वाल्मिक विरोधात आहे. 
3. वाल्मिकविरोधात 3 गुन्हे हे रस्ता अडवल्याप्रकरणी आहेत. 
4. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 2 गुन्हे, असे परळीत एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. 


आता फक्त परळीत नाही तर त्याशिवाय इतर ठिकाणीही वाल्मिकविरोधात गंभीर गुन्हे आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यात वाल्मिकवर कोणते गुन्हे दाखल करण्यात आले आहेत? त्याची यादी पाहुया...


1. 2019 साली वाल्मिक कराडवर अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2. वाल्मिक कराडवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात 2024 मध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला.
3. 2006 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
4. 2 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी वाल्मिक कराडसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरुद्ध केज पोलिसांत 11 डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


एवढे गंभीर गुन्हे दाखल असतानाही वाल्मिक कराडला पोलिसांचं संरक्षण होतं. बीड जिल्ह्यातले आमदार नमिता मुंदडा आणि सुरेश धस यांना पोलीस संरक्षण नाही, मात्र आरोपी वाल्मीक कराडला दोन पोलिसांचं संरक्षण होतं. याहून धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक कराडच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसांची अनेक वर्ष बदलीही झाली नसल्याचं सांगण्यात येतंय.


संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार


संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येत नाव आल्यापासून वाल्मिक कराड फरार आहे. सीआडी याप्रकरणाचा तपास करत असून वाल्मिकचा शोध घेत आहेत. संतोष देशमुख प्रकरणासोबतच इतरही गुन्ह्यांबाबत वाल्मिक कराडची चौकशी होणार का, हाही एक प्रश्न आहे. पोलिस आरोपी वाल्मिकला कधी अटक करणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.