लक्ष्मीकांत रुईकर / विशाल करोळे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या कन्हेरीवाडीतल्या मूर्तीबद्दल आणि त्याभोवती वेढा घालून बसलेल्या नागाबद्दल धक्कादायक वास्तव 'झी 24 तास'नं समोर आणलंय. हा नाग तिथे कसा आला? याबद्दलचा खळबळजनक व्हिडीओ 'झी 24 तास'च्या हाती लागलाय. त्याचबरोबर ही मूर्ती नेमकी कुणाची? याचाही उलगडा झालाय. 


कुठून आल्या या दंतकथा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परळी शहरालगत असणाऱ्या कन्हेरीवाडीत रस्त्याच्या कामासाठी मुरूम खोदकाम सुरू असताना तिथं एक प्राचीन मूर्ती आढळली... विशेष म्हणजे या मूर्तीच्या भोवती कवडी रंगाचे कलिंदर नागराज वेटोळं घालून बसले होते... जेसीबी चालकानं तिथं खोदण्याचा प्रयत्न सुरू केला असता, या नागानं म्हणे फणा वर काढून जोराचा फुत्कार सोडला... नागराजांचा रूद्रावतार पाहून जेसीबी चालकानं तिथून पळ काढला. जेसीबी मागं घेतल्यानंतर तो नाग पुन्हा मूर्तीला वेटोळं घालून बसल्याचं सांगितलं गेलं. 


या सगळ्या दंतकथा सांगितल्यानंतर 'झी 24 तास'नं वास्तव उघड केलंय. इथे हा नाग स्थानिक लोकांनीच नाग आणून सोडलाय. त्याचा धक्कादायक व्हिडीओ 'झी 24 तास'च्या हाती लागलाय.  


मूर्ती विष्णूची नव्हे, सूर्यनारायणाची!


खोदकामात सापडलेल्या या मूर्तीची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ही मूर्ती विष्णूची नसून सूर्यनारायणाची असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. या मूर्तीच्या दोन्ही हातात कमळाचे फुल असल्यामुळे ही मूर्ती सूर्याचीच असल्याचं पुरातत्व खात्याचं म्हणणं आहे. विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा,आणि पद्म असते. तर सूर्याच्या दोन्ही हातात कमळाचे फुल असतं. अर्धवट तुटलेली ही मूर्ती अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी ठेवण्यात आली असावी... आणि  ती कालांतरानं जमिनीत पुरली गेलेली असावी, असं पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी म्हटलंय.  


या ठिकाणी आणखी खोदकाम झालं तर आणखी काही संदर्भ मिळणार आहेत. पुरातन मूर्ती मिळाली हे जरी खरं असलं तरी त्याच्याभोवती नाग सोडून स्थानिकांनी अंधश्रद्धेलाच खतपाणी घातलंय. पण 'झी 24 तास'नं हे वास्तव समोर आणून अंधश्रद्धेवर प्रहार केलाय... आणि अंधश्रद्धेचा बाजारही उठवलाय.