विष्णु बर्गे, झी मीडिया, बीड : मुलांसाठी घरानंतर शाळा हीच योग्य वळण लावण्याचं ठिकाण असतं आणि आईवडिलांनंतर आईवडिलांनंतर शिक्षक हेच पहिले गुरू असतात. विद्यार्थी आणि समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे अतिशय महत्त्वाचं योगदान असतं. मात्र बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Beed Forty students were beaten by the teacher for saying good morning)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडमध्ये आदराने गुड मॉर्निंग म्हणणाऱ्या चोवीस विद्यार्थ्यांना शिक्षकाने जबर मारहाण केली आहे.  24 विद्यार्थ्यांना शिक्षकाने व्हेरी गुड मॉर्निग ऐवजी फक्त गुड मॉर्निंग म्हटल्याने छडीने मारहाण केली आहे.


परळी शहरातील वडसवित्री नगर येथील नागनाथ निवासी विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे अमानुष कृत्य करणाऱ्या शिक्षकावर आता गुन्हा दाखल झाला आहे.


शिक्षक वर्गात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी एका सुरात गुड मॉर्निंग असं म्हटलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व्हेरी गुड मॉर्निंग म्हणायला हवं होतं असं शिक्षकांचे म्हणणं होतं. तसे न म्हटल्याने या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षा दिली. या मारहाणीत विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे.


यामध्ये एका विद्यार्थ्याचे बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे आंबेजोगाई येथील स्वराती रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत. दिवसाची सुरुवात करतात गुड मॉर्निंगने होते मात्र या विद्यार्थ्यांची चार दिवसांपूर्वीची सकाळ ही बॅड मॉर्निंगने झाली.


गुड मॉर्निंग म्हणण्याचा आवाज विद्यार्थ्यांचा शिक्षकाला रुचला नाही आणि त्यांनी थेट छडीचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आठवी वर्गात शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना छडीने या शिक्षकांनी चांगलंच बदलून काढलं. या शिक्षकाच्या शिक्षेचा प्रकार विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना सांगितला.


 मुख्याध्यापकांनीही या शिक्षकाला समज देण्याचा प्रयत्न केला मात्र शाळेचे इतर शिक्षक या शिक्षकांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यानंतर हे प्रकरण थेट परळीच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं विद्यार्थी पालकासह पोलीस स्थानकात दाखल झाले. या शिक्षकावरती तक्रार दिल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत शाळेच्या व्यवस्थापन विभागाला विचारणा केली असता हा सर्व प्रकार घडल्याचं त्यांनी कबूल केलं आणि या सर्व प्रकारानंतर योग्य ती कार्यवाही होईल असं देखील सांगितलं गेलं असं असलं तरी या शिक्षकांवरती काय कारवाई होते हे पाहणे देखील गरजेचे आहे. तर ज्या शिक्षकांनी ही मारहाण केली त्यांना देखील आम्ही फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.