विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीड शहरातील डॉक्टर मनीषा उलगलमुगले यांनी आपल्या स्वतःचा पेशा सांभाळत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी अनोखा उपक्रम राबवला आहे. डॉक्टर मनीषा स्वतः अनेक शाळांना भेटी देत  शालेय विद्यार्थ्यांना नवनवीन पुस्तक उपलब्ध करून देत आहेत.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. डॉ. मनीषा शाळेत जाऊन मुलांकडून पुस्तकं वाचून घेतात. विद्यार्थ्यांना आवडतील अशा हजारो पुस्तकांचा त्यांनी संग्रह केला आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे डॉक्टर मनीषा उलगलमुगले यांचा उपक्रम
अनेक वेळा ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पाठ्यपुस्तकांशिवाय इतर पुस्तक पोहोचत नाहीत. शहरी भागांमध्ये पालकांची जागरूकता आणि इतर कारणामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तक किमान पोहोचली जातात. मात्र ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावी आणि वाचनाचा छंद जोपासून नवीन नवीन कल्पान त्यांना सुचव्यात यासाठी बीड शहरातील महिला डॉक्टर मनीषा उलगलमूगले यांनी या उपक्रमाची सुरवात केली आहे. 


बीडच्या जिल्हा प्रशासनाने ही दिली परवानगी
परिषदेच्या शाळेत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा  उपक्रम राबवण्यास परवानगी देण्यात आली आहे .या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगी, वाचन, लेखन, आणि भाषण क्षमतांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नाट्यवाचन, अभिवाचन, संवाद आणि निवेदन या कौशल्यांचा विकास करण्यासाठी हा उपक्रम घेण्याची परवानगी  दिली आहे.


शाळा दत्तक घेण्याचा त्यांचा निर्धार
बीजांकूर वाचनाचा या उपक्रमात सहभागी होणारी मुलं आपल्या गावातील, वाड्या, तांड्यावरील लोकांना वाचनासाठी प्रवृत्त करतील आणि वाचन चळवळ पुढे घेवुन जातील याचा मला विश्वास आहे, असं डॉ. मनीषा म्हणतात. त्याच बरोबर बीड तालुक्यातील आहेरचिंचोली गावातील जिल्हा परिषद शाळा त्या वाचनासाठी दत्तक घेणार आहेत.


मोबाईल कडून मुलांनी पुस्तकांकडे वळावं 
आज अनेक मुलं मोबाईल मध्ये गुंतून राहत आहेत, त्यामुळे पुस्तक वाचणाची आवड कमी होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचणाची आवड रुजावी आणि मुलं पुन्हा मोबाईलकडून पुस्तकाकडे वळवीत यासाठी डॉ. मनीषा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना हळूहळू यश येतंय. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांच कौतुक केलं आहे. डॉ. मनीषा यांच्या उपक्रमामुळे आम्हाला नवनवीन पुस्तकं वाचायला मिळत आहेत, महापुरुषांचा इतिहास, विज्ञान, जगभरातील विविध घटना हे सोप्या पद्धतीने माहिती करुन घेत आहोत, असं विद्यार्थ्यांनी सांगितलं.


डॉ. मनीषा यांच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे. शाळेत विद्यार्थ्यांचा हजेरीपट वाढू लागला आहे. पण विद्यार्थ्यांच्या वाचनात आणि ज्ञानात अधिक भर पडण्यासाठी त्यांना आणखी पुस्तकांची आवश्यकता आहे. डॉ. मनीषा यांच्यासारख्या समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केली तर देशाचं भविष्य असलेली पिढी अधिक सक्षम होईल.