Ganesh Visarjan 2023 :  गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला केला आहे.  पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरण परिसरात हा प्रकार घडला आहे. हिर्डोशी‌ येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला  लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा 100 हून अधिक जणांचा मधमाशांनी चावा घेतला. यामुळे एकच गोंधळ उडाला आणि पळापळ झाली.  गणपती विसर्जन न करताच अनेकजण निघून गेले.


नेमकं काय घडले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडलीय. हिर्डोशी‌ येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी धरणाच्यापाण्याजवळ आरती करत असताना मधमाशांनी नागरिकांवर अचानक हल्ला केला. यावेळी लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 हून अधिक जणांचा मधमाशांनी चावा घेतला. त्यानंतर झालेल्या पळापळीत शेवटी गणपती विसर्जन न करताच निघून जाण्याची नागरिकांवर वेळ आली. नंतर हिर्डोशी येथील काही ग्रामस्थांनी धरणाच्या पाण्याशेजारी असलेल्या त्या गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन केले. भोर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या हिर्डोशी येथे गणेश विसर्जनावेळी आरती करताना अचानक मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला केला. त्यात अंदाजे 100 हून अधिक जणांना मधमाशांनी चावा घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


मधमाशांनी चावा घेतल्याने पळापळ झाली


हिर्डोशी‌ येथील स्मशानभूमीशेजारी असलेल्या नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जन केले जाते. त्याच ठिकाणी विसर्जन मिरवणूक साडेतीन वाजण्याच्या पोहचली. गणेश विसर्जनापुर्वी आरती करत असताना अचानक मधमाशा घोंगाऊ लागल्या आणि आरती चालु असतानाच ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला. विसर्जनासाठी लहान मुले, युवक, महिला, पुरुष असे अंदाजे दिडशे जण उपस्थित होते. त्या प्रत्येकाला मधमाशांनी चावा घेतला. त्यामुळे सर्व जण रानोमाळ पळू लागले. परंतु मधमाशा त्यांच्या मागे लागून चावत होत्या. शेवटी गणेश विसर्जन ठेवून लोकं निघून गेली. लहान मुलांना जास्त चावा घेतला. त्यामुळे त्यांना त्रास होत होता.


काही वेळाने मधमाशा गेल्यावर‌ स्थानिक ग्रामस्थ धोंडिबा मालुसरे, बबन मालुसरे, बबन राजीवडे, अरुण मालुसरे, लक्ष्मण धामुनसे, संतोष मालुसरे, अंकुश धामुनसे आदी ग्रामस्थांनी गणेश आणि गौरी विसर्जन केले.
हिर्डोशी येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर पदे रिक्त असल्याने या नागरिकांवर प्रथमोपचार करण्यास विलंब झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.