लोकसभा निवडणुका संपण्याआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार? मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार?
लोकसभा निवडणुकीआधी राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का याची चर्चा सुरु झालीय. कारण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेलं विधान.
Maharashtra Politics : वर्ष 2019... महाराष्ट्रात घडला होता राजकीय भूकंप... 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना युती तुटली... ठाकरेंनी पवारांची त्यावेळची राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हात मिळवत मविआचं सरकार स्थापन केलं. मातोश्रीवर बंद दाराआड झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या वचनावरुन ही युती तुटल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी वारंवार केला.. मात्र आता याच मतभेदावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक विधान केले आहे,
अमित शहा यांनी मुलाखतीत नेमकं काय म्हंटलय?
महाराष्ट्रात 2019 मध्ये काय झालं? तुम्हाला भुतकाळात जाण्याची संधी मिळाल्यास कोणती गोष्ट बदलाल? असा प्रश्न अमित शाहांना विचारण्यात आला होता. त्यावेळेस जे काही घडलं त्यामध्ये भाजपाला सर्वात मोठा फटका बसला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला बहुमत मिळालं होतं. शरद पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरेंना आमच्यापासून दूर घेऊन गेले. उद्धव ठाकरे आमचे चांगले मित्र होते. ज्यांनी कोणी हा गोंधळ सुरु केला, त्यांनी हे संपवलं पाहिजे असं उत्तर अमित शाहांनी दिलंय.
उद्धव ठाकरे मित्र होते, पवारांनीच तोडले'
ठाकरे गटाने मात्र युती तोडण्याचं खापर भाजपवरच फोडलंय. 2014 ला युती कोणी तोडली? तरी आम्ही नंतर सत्तेत सामील झालो, दोन पाऊल मागे जाऊन आम्ही युती धर्म पाळला अस सचिन अहिर म्हणाले. उद्धव ठाकरेंना मित्र म्हणत अमित शाहांनी परत एकदा टाळीसाठी हात पुढे केलाय का याचीच राजकीय चर्चा सुरु झालीय. याआधी भाजपसोबत येण्याची ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उद्धव ठाकरेंना दिली होती..तेव्हा आता नरेंद्र मोदी आणि अमित शाहा हे उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का हा प्रश्नही भाजपला विचारला जातोय. यावरही अमित शाहांनी सूचक विधान केलंय.
उद्धव ठाकरेंना परत सोबत घेणार का? अस प्रश्न अमित शहांना विचारण्यात आला. सध्या राज्यामध्ये भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटाबरोबर युतीत आहे. आमची सध्या युती असून सारं काही सुरळीत सुरु आहे असं सूचक विधान अमित शाहांनी केलंय. अमित शाहा हे भाजपचे राजकारणातले चाणक्य मानले जातात.. तेव्हा लोकसभा निवडणुकीआधी अमित शाहांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या सूचक विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जातायत. निकालाआधी अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना घातलेली ही साद आहे का याचीही चर्चा सुरु आहे..