नितेश महाजन, झी मीडिया, औरंगाबाद : रस्त्यावर भिक मागणारी लहान मुलं रस्त्यावर, सिग्नलजवळ तुम्ही पाहिली असतील. पण ही मुलं नेमकी कोण असतात? कुणाची असतात? कुठून येतात? त्यांना भिक मागायला कोण लावतं? याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलांना भीक मागायला लावणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक म्हणजे भीक मागण्यासाठी 100 रुपयांच्या बाँड पेपरवर दोन लहान मुलांना दीड लाखात विकत घेण्यात आलं होतं.


लहान मुलांचा होत होता अमानुष छळ


औरंगाबादच्या संजयनगरमधल्या इमारतीतील एका घरात दोन लहान मुलांचा अमानुष छळ होत होता. मुलांच्या रडण्याच्या आवाजानं शेजारी राहणाऱ्या लोकं अस्वस्थ झाली होती. पण इमारतीची मालकीण काही केल्या दार उघडायची नाही. अखेर नागरिकांनी या मारहाणीची माहिती एका समाजसेवकाला सांगितली.
याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आलं. जनाबाई उत्तम जाधव आणि सविता संतोष पगारे या मायलेकींचं बिंग फुटलं. या दोघी मुलांना भीक मागायला लावायच्या आणि भीक मागितली नाही तर बेदम मारहाण करायच्या..


धक्कादायक वास्तव उघड


चौकशीनंतर याप्रकरणातलं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. जनाबाई जाधव आणि सविता पगारे यांनी जालन्याहून 5 वर्षाच्या मुलाला 50 हजार रुपयांत तर 2 वर्षाच्या मुलाला 1 लाख रुपयात विकत घेतल्याची कबुली दिली आहे. आश्चर्य म्हणजे मुलांना विकत घेण्याचा व्यवहार त्यांनी चक्क 100 रुपयांच्या बाँड पेपरवर दाखवण्यात आला आहे.


भीक मागितली नाही तर मारण्याची धमकी


या मायलेकींच्या तावडीतून सोडवेलल्या मुलांनी सांगितलेली कहाणी काळीज पिळवटून टाकणारी आहे. आम्हाला भीक मागण्यासाठी सांगितलं जात होतं, भीक मागितली नाही तर लाथाबुक्क्यांनी मारहाण होत होती. बाथरुममध्ये झोपायला लावणं, पाण्यात बसवून ठेवलं जात होतं, असं मुलांनी सांगितलं. चौकशीनंतर मुकुंदवाडी पोलिसांनी आता या निर्दयी मायलेकींना अटक केली आहे. तर लहान मुलांची रवानगी बाल सुधारगृहात केलीय.


संजयनगरमधल्या नागरिकांनी सतर्कता दाखवल्यानं माणुसकीला काळिमा फासणारा हा गोरखधंदा उजेडात आला आणि चिमुरड्यांची सुटका झाली. मुलांना भीक मागायला लावण्याच्या या काळ्या धंद्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का? यामागं एखादी टोळी कार्यरत आहे का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.