अकोला : आपण राज्यमंत्री असल्याने जास्त अधिकार नसल्याची खंत बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे.अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नुकतीच जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.  काम असेल तरच एखाद्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहता येत असल्याची खंत देखील यावेळी त्यांनी बोलून दाखवली. राज्यमंत्र्यांच्या सिमीत अधिकारांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीची सत्तास्थापना झाल्यानंतर बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. या जागावाटपानंतर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षातील काही नेते महत्वाचे पद न मिळाल्याने नाराज आहेत. त्यातील अनेकांनी ही नाराजी व्यक्त देखील केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला भेटीत बच्चू कडुंनी प्रशासनातील अनागोंदीबद्दल जिल्हा प्रशसनाला तंबी दिली आहे. 25 जानेवारीला पुन्हा जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांनी बोलावली आहे. आजच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बच्चू कडूंच्या प्रश्नांनी अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. तर क्रीडा अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी दिली. त्याचप्रमाणे धुळीचे शहर अशी ओळख निर्माण झालेल्या अकोला शहराची लवकरच ही ओळख पुसून काढणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. 


अकोला महापालिकेतील अपंगांच्या योजनापासून त्यांना वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला दोन दिवसात निलंबित करण्याची सूचना बच्चू कडू यांनी केली आहे. 



राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसह मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर रक्तदान केलं. हे रक्त थँलेसेमिया रुग्णांना दिले जाणार आहेत. आता तर हातात दंडुका आला असल्यानं तीच आक्रमकता कायम राहिल, परंतु कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.


महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू यांना राज्यमंत्रिपद मिळालं. बच्चू कडू हे अपंग आणि रुग्णांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवतात. काही दिवसांपू़र्वी अपंग आणि रुग्ण यांना सोईचे होईल अशा प्रकारचे मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर कार्यालय आणि शेजारील बंगल्याची मागणी केली होती. पण त्यांना ते मिळाले नाही. यावर त्यांनी अधिकाऱ्यांवर आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे.


ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर लोकनेते बच्चू कडू यांनी लगेचच कामाला सुरुवात केली. बच्चू कडू यांनी दर्यापूरमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची अक्षरशः झाडाझडती घेतली होती. यावेळी त्यांनी कामचुकारपणा करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना इंगा दाखवला. लोकांची कामे वेळेत न करणाऱ्या दोन नायब तहसीलदारांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.