Long Weekend Tourists Destinations : वर्षातली सर्वात पहिली मोठी सुट्टी चालून आली आणि नोकरदार वर्गाचा आनंद गगनात मावेनासा झाला. साचेबद्ध नोकरी, कामं करून कंटाळलेल्या सर्वांनीच मग बेत आखण्यास सुरुवात केली एखाद्या अशा ठिकाणी जायची, जिथं चार दिवस कुणाचीही अडचण होणार नाही. तुम्ही या सुट्टीसाठी काय प्लान करताय? काहीच नाही? असं कसं चालेल? (best places to visit in a long weekend )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुट्टी चालून आलिये, त्यामुळं महिना अखेर असली तरीही पैशांची जुळवादजुळव सहज शक्य आहे. रोजच्या आयुष्यातून काहीशी वेगळी वाट निवडा आणि हाकेच्या अंतरावर असणाऱ्या, खिशाला परवडणाऱ्या काही खास ठिकाणांना नक्की भेट द्या. 


तेचतेच अलिबाग कशाला? हा घ्या नवा पर्याय.... (Alibaug)


जोडून आलेली सुट्टी म्हटलं की अनेकांचेच पाय अलिबागकडे वळतात. म्हणजे मुंबई- पुण्यातून तरी इथं अनेकजण येतात. पण आता तिथंही वाढणारी गर्दी पाहता अलिबाग म्हटलं तरी नको रे बाबा असा सूर अनेकजण आळवतात. अशा मंडळींसाठी (Revdanda) रेवदंड्याच्याही पुढे असणारा (Chikni beach) चिकनीचा समुद्रकिनारा, मुरूड (Murud) ही टुमदार गावं चांगले पर्याय ठरतील. किफायतशीर राहण्याची सोय आणि चवीष्ट जेवण देणाऱ्या खानावळी इथं तुमच्या गरजा भागवतील. इथं असणारी पाटील खानावळ सध्या प्रचंड चर्चेत असून, इथल्या Fish Thali वर अनेकजण उभाआडवा ताव मारतात. तिथूनच पुढे (Srivardhan) श्रीवर्धनचा किनाराही बऱ्याच अंशी निर्मनुष्य असल्यामुळं हा पर्यायही तुम्ही पाहू शकता. आगरदांडा (Agardanda) इथं असणारे काही पर्यायही तुमच्यासाठी खुले असतील. प्राधान्यानं तुम्ही इथं स्वत:च्या वाहनानं आलात तर आजुबाजूची पर्यटनस्थळं फिरताही येतील. 



थोडं खुद्द कोकण किनारपट्टीकडे जायचं झाल्यास तुम्ही निवती (Nivti) येथे जाऊ शकता. Mainstream कोकण (Konkan) पासून काहीसं Offbeat जायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. माणसांचा कल्ला नाही, उगचची गर्दीही नाही. त्यामुळं निवतीला येऊन तुम्ही चार दिवस निवांत राहू शकता. इथं तुम्हाला किमान पैशांमध्ये राहण्याखाण्याची सोय उपलब्ध असेल. किनाऱ्यालगत राहण्याची इच्छा असेल तर मात्र काहीसे जास्त पैसे मोजण्यासाठी तयार राहा.  


महाबळेश्वर नको, पण वाई चालेल... 


(Mahabaleshwar) महाबळेश्वरमध्ये सध्या हवामानानं सुरेख रुप धारण केलं आहे. हो पण, तिथं जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. परिणामी तिथं हॉटेल्सचे दरही गगनाला भिडले आहेत. तुम्ही हिरमोड करुन घेऊ नका, कारण महाबळेश्वर नही तो वाई (Vai) सही... असं म्हणत तुम्ही धोम धरणाच्या आजुबाजूचा परिसर नव्यानं पाहू शकता. इथं अनेक ठिकाणी रिसॉर्ट्सची उत्तम सोय करून देण्यात आली आहे. (Satara) सातारा- महाबळेश्वर रस्त्याला असताना पाचगणीचा (Panchgani) घाट सुरु होतानाच पायथ्याशी असणाऱ्या सिद्धगिरी हॉटेलमध्ये (Hotel Siddagiri) गरमागरम मटण- चिकन थाळीवर (Mutton Thali, Chicken Thali) ताव मारा आणि मगच पुढच्या प्रवासाला निघा. 


हेसुद्धा वाचा : Weather Update : मनालीहून वेण्णालेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert 


डोंगर, दऱ्यांच्या वातावरणात रममाण होऊ इच्छित असाल, तर पाचगणी (Panchgani), भोसे (Bhose), भिलार (Bhilar) हे पर्यायही तुम्ही निवडू शकता. इथं अनेक स्थानिकांनी त्यांच्या घराला लागूनच पर्यटकांसाठी काही राहण्याच्या व्यवस्था उपलब्ध करून दिल्या आहेत. (Strawberry Farming) स्ट्रॉबेरीची शेती तुम्ही इथं अगदी जवळून पाहू शकता. सरासरी पाच ते सहा तासांचा प्रवास करून तुम्ही या नयनरम्य ठिकाणांवर पोहोचू शकता. खासगी वाहन किंवा लाल परी अर्थात एसटी तुम्हाला इथं सोडू शकते. 



अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणाऱ्या राजूरलाही (Rajur) तुम्ही भेट देऊ शकता. इथं काही दिवसांपासून Camp on Wheels ही एक नवी संकल्पना सुरु करण्यात आली आहे. जिथं तुम्ही कॅम्परव्हॅनमध्ये (Campervan) राहण्याचा आनंद घेऊ शकता. काहीशा उंचीवर असणाऱ्या सुरेख अशा पठारावर असणाऱ्या या अनोख्या ठिकाणहून तुम्हाला निसर्गाची साद अगदी सहज ऐकू येईल. इथं तुम्ही स्वत:ला हवं तसं जेवणही बनवू शकता बरं. कमाल आहे ना! 



महाराष्ट्र ओलांडायचाय? 


जोडून आलेल्या सुट्टीमध्ये एखादा दिवस वाढवलात तर तुम्ही राज्याच्या सीमा ओलांडून कधीही न पाहिलेल्या पर्यटनस्थळांनासुद्धा भेट देऊ शकता. इथं मात्र तुम्हाला खर्चाची जुळवाजुळव करावी लागणार आहे. कारण, राज्य ओलांडत असल्यामुळं प्रवास आणि तिथं राहण्याच्या सोयींसाठी बराच आटापिटा करावा लागेल. त्यातही शेवटच्या क्षणी बेत आखत असाल तर जरा काळजीच घ्या. 



तर, महाराष्ट्राबाहेर फिरण्यासाठी निघण्याच्या बेतात आहात? हंपी (Hampi), गोकर्ण (Gaokarna), नेत्रावली (गोवा) (Netravali - Goa) यापैकी एखादा पर्याय तुम्ही निवडू शकता. शेवटच्या क्षणी बस, रेल्वे किंवा विमानाचं तिकीट बुक होणं काहीसं कठीण असेल. पण, तुम्ही स्वत:चं वाहन असेल तर थेट बॅगा भरून प्रवासच सुरु कराल. सोशल मीडिया आणि युट्यूबवर सध्या या प्रत्येक ठिकाणची थोडीथोडकी ते अगदी सविस्तर माहितीही उपलब्ध आहे. त्यामुळं तुम्ही फक्त ठिकाण निवडा आणि सुटा.... !