तुषार तपासे, सातारा : हनी ट्रॅपबद्दल तुम्ही चित्रपटात पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. मात्र आता हनी ट्रॅप तुमच्यापर्यंत येवून पोहचलाय. कारण राज्यात सध्या हनी ट्रॅप करणारी टोळी सक्रीय झालीय. सोशल मीडियाच्या मायाजालातून अनेक जण याचे शिकार होत आहेत. त्यामुळे हा रिपोर्ट पाहा आणि सावध व्हा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या राज्यात हनी ट्रॅप करणाऱ्यांची टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी प्रतिष्ठित व्यक्तींना आपली शिकार बनवते. या टोळीतल्या महिला सोशल मीडियातून वारंवार मेसेजेस पाठवून आणि फोन करून जवळीक साधतात. आणि हनी ट्रॅप लावून ब्लॅकमेल करतात. सध्या पश्चिम महाराष्ट्रात असे प्रकार समोर येऊ लागले आहेत. याच टोळीतली महिलेनं व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून साथीदारांच्या मदतीनं ६ लाख रूपये, सोने, चांदी आणि अलिशान कार घेऊन पसार झाली. मात्र बदनामीच्या भीतीपोटील या व्यावसायिकानं झालेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र आरोपींनी पळवलेली या व्यावसायिकाची कार फलटण येथे आढळून आली आणि या हनी ट्रॅपचा पर्दाफाश झालाय. 


हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी या टोळीची खास मोडस ऑपरेंडी आहे. दोन आरोपी पहिल्यांदा महिलेचा डीपी व्हाट्सअॅपला ठेवून चॅटिंग करतात. त्यानंतर महिलेच्या तोंडाला स्कार्प बांधून व्हीडीओ कॉल वर बोलण्यास सांगतात. नंतर चॅटिंगमध्ये अश्लील फोटोंची देवाण घेवाण केली जाते. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला धमकावून त्यांच्या कडून पैसे उकळतात. 


या टोळीनं पश्चिम महाराष्ट्रात हनी ट्रॅपमधून अजून किती जणांना गंडा घातला आहे. याचा पोलीस कसून तपास करत आहे. मात्र जे या हनी ट्रॅपचे बळी ठरले आहेत त्यांनी पुढे येवून तक्रार दाखल करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.