पाण्याचे पैसे दिले अन् ट्रेन पकडणार तितक्यात.... दुर्दैवी अपघातात तरुणाने गमावला हात अन् पाय
Bhandara Accident : भंडाऱ्यात घडलेल्या या रेल्वे अपघाताने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भंडाऱ्यातील तुमसर रेल्वे स्थानकावर हा सगळा प्रकार घडला आहे. गोंडवाना एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने या अपघातात आपला हात आणि पाय गमावला आहे.
प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातांमध्ये (Railway Accident) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धावती रेल्वे गाडी पकडण्याच्या नादात अनेकजण जीव गमावून बसतात. तर काहीवेळा रेल्वे फलाटांवर असलेल्या सुरक्षा कर्मचारी असा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र भंडाऱ्यात (Bhandara Accident) धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करणं तरुणाला चांगलचं महागात पडलं आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर रेल्वे स्थानकावर एका युवकाला धावत्या रेल्वेत चढण्याच्या नादात प्रवासी युवकाला कायमचे अपंगत्व आल्याची घटना घडली आहे.
या अपघातात तरुणाला एक हात आणि एक पाय गमावावा लागला आहे. धावती रेल्वे पकडण्याच्या तरुणाला मात्र कायमचं अपंगत्व आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातातील जखमी युवकाचे नाव शुभम रवी शहारे (25) रा. कुळवा, गोंदिया असे आहे. अपघात घडताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ दखल घेत जखमी शुभमला तुमसर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र परिस्थिती बघता शुभमला गोंदिया येथे हलवण्यात आले आहे.
तुमसर रोड हे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन आहे. या ठिकाणी जवळपास सर्वच एक्सप्रेसला थांबा असल्याने प्रवाशांची आणि प्लॅटफॉर्मवर छोट्या दुकानांची चांगलीच गर्दी दिसून येते. 3 जुलैच्या दिवशी फलाट क्रमांक तीनवर गोंडवाना एक्सप्रेस थांबली होती. याच गाडीतून शुभम गोंदियाहून नागपूरकरता निघाला होता. जखमी शुभम देव्हाडी तुमसर रोड स्थानकावर पाणी पिण्याकरता गाडीतून उतरला. मात्र पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये उशीर झाल्याने त्याची गाडी सुटली. मात्र, मध्यम गती असलेल्या गोंडवाना एक्सप्रेसला पकडण्याच्या नादात शुभम चुकला. त्यात त्याचा तोल जाऊन तो फलाट व गाडीच्यामध्ये खाली पडला आणि दबला गेला. शुभम खाली पडल्याचे कळताच रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ उडाला. आरडाओरडा झाल्यानंतर गोंडवाना एक्सप्रेस थांबवण्यात आली. मात्र तोपर्यंत शुभमचे एक हात व पाय अक्षरशः तुटून पडले होते. सीआरपीएफने तात्काळ धाव घेऊन जखमी शुभमला बाहेर काढले. रेल्वे नियमानुसार घटनेची नोंद करुन वैद्यकीय उचारांसाठी तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
लोकलच्या धडकेने हवेत उडाला तरुण
मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी एक मोठी दुर्घटना घडली होती. एसी रेल्वेने धडक दिल्याने एका 17 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. धडक इतकी जबरदस्त होती की तरुणाने जागीच आपला जीव गमावला. मयांक अनिल शर्मा असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो मालाड मालवणी येथे राहत होता. जेवणानंतर डबा फलटावर डबा धूत असतानाच एसी लोकलेने मयांकला धडक दिली होती. या धडकेनंतर मयांकचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.