प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा (Bhandara Crime) शहरालगतच्या गणेशपूर येथे एका मनोरुग्ण महिलेवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत यासंदर्भात तक्रार दिली होती. पोलिसांनी बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध सुरु केल्यानंतर तीन दिवसांनी पीडित महिला सापडली. मात्र महिलेसोबत घडलेला प्रसंग पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) एका नराधमाला अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोरुग्ण महिलेवर भंडाऱ्यातील गणेशपूर येथील एका गावालगतच्या स्मशानभूमीत नेऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भंडारा पोलिसांनी या प्रकरणी एका नराधामला पाच दिवसांनंतर अटक केली आहे. बसूराज पंढरी नंदेश्वर (57 रा.रमाबाई आंबेडकर वार्ड)  असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.


गणेशपूर येथील 47 वर्षीय महिला ही मनोरुग्ण असून गावात फिरत होती. 28 एप्रिल रोजी ही महिला संध्याकाळी घरी न गेल्याने तिच्या कुटुंबियांनी भंडारा पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. दरम्यान 30 एप्रिलला स्मशानभूमीत मनोरुग महिला ही अर्धनग्न बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमानव्ये गुन्ह्याची नोंद केली होती. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत फरार असलेल्या आरोपीला तब्बल 5 दिवसानंतर अटक केली आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"भंडारा पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याता आला आहे. गणेशपुरच्या जंगलाच्या परिसरात एक महिला नग्न अवस्थेमध्ये आढळून आली होती. या महिलेची बेपत्ता होण्याची तक्रार 30 एप्रिल रोजी दाखल करण्यात आली होती. 30 तारखेला पोलिसांना ही महिला सापडली होती. महिलेच्या शरीरावर कपडे नव्हते. तपासानंतर 50 मीटर अंतरावर महिलेचे कपडे आढळून आले. महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. महिला जबाब देण्याच्या अवस्थेत नाही. सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध लावला आहे. तपासामध्ये एक रिक्षा तिथे गेली असल्याचे समोर आले होते. पाच तासानंतर ही रिक्षा घटनास्थळावरुन परतली होती. रिक्षाचालक बसुराज पंढरी नंदेश्वर याची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला आहे. महिलेची मानसिक स्थिती पूर्वरत झाल्यानंतर जबाब नोंदवण्यात येणार आहे," अशी माहिती पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी दिली आहे.