पोलिसांच्या साथीने राष्ट्रीय महामार्गावर धक्कादायक प्रकार; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Bhandara Crime: पोलिसांच्या साथीने ट्रक चालकांना लुटले जात असल्याचे दिसत आहे.
Bhandara Crime: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्याने भंडारा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना पोलीस लुटत असल्याचा प्रकार सर्रास खुलेआम सुरू आहे. ट्रक चालकांना रिफ्लेक्टर लावण्याच्या नावाखाली लुटण्याचा गोरख धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे. मोबाईल कॅमेरामधील काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यानुसार पोलिसांच्या साथीने ट्रक चालकांना लुटले जात असल्याचे दिसत आहे.
पोलीस हे नागरिकांच्या संरक्षणासाठी असतात. पण काही पोलीस हे आपल्या वर्दीला, कर्तव्याला काळीमा फासतात. यामुळे पोलीस प्रशासन बदनाम होत असते. एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या संगनमताने ट्रक चालकांची लूट सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल असते. ही वाहन दूरवरच्या प्रवासासाठी निघालेली असतात. अशावेळी या वाहन चालकांना रस्त्यामध्ये अडवून वाहतूक नियमांचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैसे लुटले जात असल्याची घटना समोर आली आहे.कुठे आणि कसा सुरु आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी देखील उपस्थित
काही लोक साकोली सौंदळच्या रस्त्यावर भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक चालकांना थांबवत आहेत. त्यांना रिफ्लेक्टर लावण्याची सक्ती करत आहेत. ट्रक चालकांकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे. यात धक्कादायक प्रकार म्हणजे पोलिसांच्या वरदहस्तानेच हा प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. ट्रक चालकांना लुटणाऱ्यांच्या साथीला साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी देखील उपस्थित असल्याचे दिसत आहे. वाहतुकीच्या नियमांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांना निःशुल्क रिफ्लेक्टर लावण्याचा उल्लेख आहे. मात्र कुठल्याही दुचाकीला अद्यापही रिफ्लेक्टर लावण्यात आलेला नाही.
पोलिसांच्या मदतीने ट्रक चालकांना लुटण्याचा धंदा सुरू
भर रस्त्यावर पोलिसांच्या मदतीने ट्रक चालकांना लुटण्याचा धंदा सुरू असल्याचा प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला आहे.. 'तुम्हाला पोलीस एन्ट्री करावी लागेल,' असा दम ट्रक चालकांना दिला जातो. ज्या गाड्यांना रिफ्लेक्टर लावले आहेत अशा गाड्यांनादेखील रस्त्यावर थांबवून पैसे वसूल केले जात असल्याचा प्रकार समोर आलाय. भर रस्त्यावर ट्रक थांबविलेा तर मागून येणारी एखादी गाडी ट्रकला आदळून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास याला पोलिस प्रशासन जबाबदार राहणार आहे का? असा प्रश्नदेखील उपस्थीत केला जात आहे.