भंडाऱ्यातील कारागृहात आढळला मोबाईल, शौचालयातील भिंतीमध्ये लपवल्या होत्या बॅटरी
या घटनेमुळे कारगृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तसेच कारागृहात मोबाईल, बॅटरी हे नेमकं आलं कसं याबद्दल तपास सुरु आहे.
Bhandara Jail Mobile Found : भंडारा जिल्हा कारागृहात मकोकाच्या आरोपाखाली बंदिस्त असलेल्या एका कैद्याने बराकीलगतच्या शौचालयातील भिंतीमध्ये मोबाईलच्या चार बॅटरी लपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच त्याच्या बराकीसमोरुन एक चालू स्थितीतील मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. जुल्फेकार ऊर्फ छोटू जब्बार गनी (40) असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
बुधवारी 1 मे च्या रात्री कारागृह अधीक्षक देवराव आदे यांच्या आदेशावरुन कैद्यांच्या बॅरेकची आकस्मिक तपासणी सुरु करण्यात आली होती. ही तपासणी सुरु असतानाच एका बॅरेकमधून बाहेर काही वस्तू फेकल्याचे तपास कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्या बॅरेकची कसून तपासणी करण्यात आली. रात्रीच्या दरम्यान केलेल्या तपासणीत एका बॅरेकच्या शौचालयाच्या भिंतीजवळ छिद्र करुन मोबाईलच्या चार बॅटरी लपवण्यात आल्याचे आढळले.
तसेच दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी कारागृह कर्मचाऱ्यांनी त्याच्या बॅरेकलगतच्या जागेची तपासणी केली. यावेळी त्याच्या बॅरेकमध्ये चालू स्थितीतील मोबाईल निळ्या रंगाच्या पट्टीमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत आढळला. हा बॅरेक जुल्फेकार ऊर्फ छोटू जब्बार गनी (40) या आरोपीचा आहे. मकोकाच्या आरोपाखील त्याला अटक करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून तो भंडारा जिल्हा कारागृहात बंद आहे.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
या घटनेनंतर या बॅरेकच्या सर्व बॅटरी आणि तो मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कारगृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तसेच कारागृहात मोबाईल, बॅटरी हे नेमकं आलं कसं याबद्दल तपास सुरु आहे. याप्रकरणी कोणी सहभागी आहे का? यामागील त्याचा हेतू काय होता, त्याने मोबाईलचा वापर केला होता का? केला असल्यास तो कोणाशी संभाषण करत होता? याचाही शोध सध्या सुरु आहे.