भंडारा: अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या भंडारा पोटनिवडणुकीत ४९ केंद्रांवर आज (बुधवार, ३० मे) फेरमतदान होत आहे. निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय. सोमवारी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. त्यावेळी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे बराच काळ मतदान थांबवावं लागलं होतं. आज या ४९ केंद्रांवर या सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर, नक्षलग्रस्त भागात सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. फेरमतदानावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटांना शाई लावण्यात येणार आहे.


मतदानादरम्यानच्या घोळामुळे जिल्हाधिकाऱ्यांची बदली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान भंडारा गोंदियाचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची मतदानातल्या घोळानंतर बदली करण्यात आलीय. समन्वयाचा अभाव असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आता कादंबरी बलकवडे गोंदियाच्या नव्या जिल्हाधिकारी असणार आहेत.



म्हणून फेरमतदानाचा निर्णय


भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात २८ तारखेला पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्स बंद पडल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. यामुळे निवडणुक अधिका-यांची चांगलीच धावपळ उडाली होती. काही ठिकाणी परत मतदान प्रक्रिया सुरु करतांना विलंबही झाला होता. त्यामुळेच भंडारा विधानसभा क्षेत्रात १४ ठिकाणी, साकोलीमध्ये ४, अर्जुनी-मोरगाव २, तिरोरा ८ आणि गोंदियामध्ये तब्बल २१ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेतले जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.