प्रवीण तांडेकर, झी मराठी, भंडारा : हिवाळ्याला सुरवात झाली की जशी गुलाबी थंडीची चाहूल लागते तसे या थंडीबरोबरच अनेक विदेशी पक्षी आपल्या भागात यायला सुरवात करतात. आपल्या परिसरातील शेतात, झाडांवर, माळरानावर व पाणथळ जागी या पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरवात होते. हे विदेशी पक्षी मार्च महिन्यामध्ये निघून जातात. मात्र, मे महिना लोटूनही ही  विदेशी स्थलांतरित पक्षी अद्यापही जैवविविधतेने नटलेल्या तुमसर तालुक्यातील  आसलपाणी तलावात मुक्तविहार करताना आढळून येत आहे. हा तलाव या स्थलांतरित पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भंडारा जिल्ह्यातील  नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आसलपाणी तलावावर हे विदेशी पक्षी मोठा चिवचिवाट करून मुक्तविहार करीत असल्याचे विहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. जंगलाच्या अगदी मधोमध असलेले हे तलाव निर्मनुष्य असते. या तलावात रखरखत्या उन्हाळ्यातही पाण्याची मुबलकता आणि विदेशी पक्षांना या तलावात मिळणारे खाद्य, यामुळे या पक्षांचे मे महिन्यातही तलावात वास्तव्य आहे.



नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र हे मुळात जैवविविधतेने नटलेले जंगल म्हणून जिल्ह्यात त्याची ओळख आहे. अशा या जैवविविधतेने नटलेल्या जंगलातील नयनरम्य तलावात मागील अनेक वर्षांपासून स्थलांतरित पक्षी येतात. आसलपाणी तलावाची विशेषता म्हणजे, तलावाचे शुद्ध पाणी व चारही बाजूने गवत, खुरटी झुडपे, कमळ, पणाळीली व अन्य वनस्पतीने वेढलेला तलाव परिसर,हे पक्षी मंगोलिया या देशातून आले असून त्यामध्ये  लिटिल ग्रेप्स, कॉटन पिग्मी डक्स, विसलिंग डक्स, ग्रे हेरोन, पर्पल हेरोन, पर्पल स्वॅप हेन, कॉमन कूट, वॉटर कॉफ हे स्थलांतरित पक्षी तलावात मनमुराद मुक्तविहार करताना दिसून येत आहे. 



ही स्थलांतरित पक्षांच्या आकर्षणाचे कारण आहे. थंडीच्या दिवसात म्हणजेच हिवाळ्यात या स्थलांतरित पक्ष्यांचे येथे आगमन होते. हिवाळ्याचे दिवसात येथे मुक्तविहार केल्यानंतर हे स्थलांतरित पक्षी मार्च महिन्यामध्ये निघून जातात. मात्र, यावर्षी या पक्षांचा उन्हाळ्याच्या दिवसातही या नयनरम्य परिसरातील तलावातील आल्हाददायक वातावरण असलेल्या आसलपाणी तलावातील मुक्काम अद्याप संपलेला नाही.



त्यामुळे या तलावातील आणि जंगलातील जैवविविधता त्यांच्यासाठी आकर्षण ठरले असून हा परिसर आवडल्याने जणू त्यांनी येथेच मुक्काम ठोकला अशी प्रचिती येत आहे. निर्मनुष्य असलेल्या जंगलातील या नयनरम्य तलाव परिसरात पोहोचल्यावर स्थलांतरित पक्षांचा चिवचिवाट कानाला सुखद अनुभव देतो. आणि तलावातील त्यांचा मुक्तविहार बघितल्यावर डोळ्याचे पारणे फेडतो.