प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : अन्याय झाला, फसवणूक झाली किंवा एखादा कोणता गुन्हा झाला तर आपण पोलीस स्टेशिनची पायरी चढतो. पोलीस हा आपण आपला रक्षक मानतो. पण यातले काही पोलीस भक्षक बनले तर. अशीच एक धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात (Bhandara) उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीकडे भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याने (DYSP) चक्क शरीर सुखाची मागणी केली. या पोलीस अधिकाऱ्याविरोधात भंडारा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपूर इथं इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होती. तिथे तिची ओळख एका तरूणासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं. प्रेमात दोघांनीही आणाभाका घेतल्या. काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणीला त्याच्यावर संशय आला आणि तिने त्याच्याकडे लग्नासाठी गळ घातली. पण तरुणाने लग्नास नकार दिला. यामुळे तरुणी नैराश्यात गेली. तीने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला.


सुदैवाने यातून बचावलेल्या तरुणीने धाडस करत प्रियकराविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पीडित तरुणीने एका महिलेसोबत भंडारा पोलीस स्टेशन गाठलं, पण तिथल्या उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी तरुणीला पुन्हा एकटं येण्यास सांगितलं. तरुणीला पोलीस अधिकाऱ्याच्या उद्देश न कळल्याने ती दुसऱ्या दिवशी  पुन्हा तक्रार देण्यासाठी अशोक बागुल यांच्याकडे गेली.यावेळी काम करुन देण्यासाठी अशोक बागुल (Ashok Bagul) याने तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केली. 


अशोक बागुलच्या मागणीने तरुणीला धक्का बसला. तीने भंडारा पोलीस स्थानकात याबाबत तक्रार केली. अखेर तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांचया विरोधात 354 अ , 509 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


कारवाई करण्याची मागणी
न्याय मागण्यासाठी गेलेल्या तरुणीकडेच शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करून गृह खात्याने कारवाई करण्याची मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. हे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणी तातडीने चौकशी करून कारवाईची मागणी अनिल देशमुख यांनी केलीय