प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : राज्यात पावसानं (Monsoon) गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. भंडारा (Bhandra News) जिल्ह्यातही मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. अशातच गुरुवारी भंडाऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील चिचाळ गावातील महिला रोवणीसाठी एका शेतामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. इतक्यात शेताच्या परिसरात वीज कोसळल्याने (Thunderstorm) रोवणी करत असलेल्या 25 महिला जागीच बेशुद्ध पडल्या. घटनेचीची माहिती शेत मालकाने सर्व महिलांना अड्याळ येथील ग्रामीण रूग्णालयात उपाचारांसाठी तात्काळ दाखल केले. जखमी महिलांवर उपचार सुरु असून सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आम्ही शेतामध्ये रोवणीचे काम करत होतो. आम्ही रोवणी करत असतानाच अचानक वीज कोसळली. त्यानंतर आम्ही जमिनीवर हात टेकले. हात टेकल्यानंतर आम्हाला उभे राहता येईना. आम्हाला चक्कर येऊन पायाला झोंबू लागले. आम्ही तिथेच खाली बसलो," असे पीडित महिलेने सांगितले.


"आम्ही दयाराम यांच्या शेतामध्ये रोवणीसाठी गेलो होतो. रोवणीसाठी आम्ही 20 ते 25 महिला होतो. त्यानंतर पाऊस आला आणि वीज पडली. आम्हा सगळ्यांना वीजेच्या संपर्कात आलो. त्यानंतर आम्हाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले," असे आणखी एका पीडित महिलेनं सांगितले.


वीज पडून 15 बकऱ्या जागीच ठार


दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात सध्या पावसाची  दमदार बॅटिंग सुरु आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. तिवसा तालुक्यातील जुनी भारवाडी शेतशिवारात वर्धा नदी लागत वीज पडून 15 बकऱ्या दगावल्याने चार शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तिवसा तालुक्यातील जुनी भारवाडी येथील शेतकऱ्यांच्या बकऱ्यांचा कळप वर्धा नदीलगत चरत होत्या. त्यावेळी पंधरा बकऱ्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली आहे. या दुर्घटनेत पंधराही बकऱ्या जागीच दगावल्या आहे. गुरुवारी आलेल्या पावसामुळे तालुक्यातील ममदापुर गावात एका घराची भिंत पडली असून घरातील पाच जण सुखरूप बचावले आहेत. दुसरीकडे वीज कोसळ्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.