बदलापुरात भातुकलीचं अनोखं प्रदर्शन
`भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी`... हे गाणे ऐकले की अगदी पंधरा ते वीस वर्षांपूर्वी घराच्या अंगणात खेळला जाणारा भातुकलीचा खेळ आठवतो. मात्र काळाच्या ओघात अंगण लुप्त झालं आणि त्यासोबत भातुकलीही हरवली.. मात्र हीच हरवलेली भातुकली बदलापुरकरांना पुन्हा गवसली...
बदलापूर : 'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी'... हे गाणे ऐकले की अगदी पंधरा ते वीस वर्षांपूर्वी घराच्या अंगणात खेळला जाणारा भातुकलीचा खेळ आठवतो. मात्र काळाच्या ओघात अंगण लुप्त झालं आणि त्यासोबत भातुकलीही हरवली.. मात्र हीच हरवलेली भातुकली बदलापुरकरांना पुन्हा गवसली...
दगड-मातीची इटुकली भांडी, चूल, कढई, शेगडय़ा, हंडे, कळशी, कूकर, लाटणे-पोळपाट, बादली, स्टोव्ह, घरंगळ तसंच तांब्या पितळेची आणि चांदीची इटुकली ताटं, वाट्या.. स्वयंपाक घरातच नव्हे तर रोजच्या वापरातल्या तर काही कालबाह्य झालेल्या सगळ्या वस्तू बदलापूरातल्या या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या...
या सर्व वस्तू भातुकलीच्या खेळातल्या.. इंटरनेटच्या युगात हरवलेल्या मुलांसाठी पुण्यातील विलास करंदीकर आणि त्यांच्या सहकार्यांनी तीन हाजारांहून अधिक वेगवेगळ्या भातुकलीच्या वस्तू शोधल्या... आणि बदलापूरच्या सुभाष कुलकर्णी यांनी त्याला प्रदर्शनाचं रुप दिलं... भातुकलीच्या खेळातल्या या भांड्यांचं केवळ प्रदर्शनच नाही तर भातुकली कशी खेळायची याची माहितीही इथं दिली जात होती.. इतकच नाही तर बच्चे कंपनीनं भातुकलीच्या खेळाचा डावही मांडला..
काळाच्या पडद्याआड गेलेले घरातले आणि अंगणातले 50 प्रकारचे खेळही इथं मांडण्यात आले होते.. भातुकलीच्या या खेळाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालीये.. बदलापूरकरांनी या भातुकलीच्या प्रदर्शनाला मोठी गर्दी केली.. खेळानंतर मुलांनी लिहिलेले अभिप्राय खूपच बोलके होते.. भातुकलीच्या खेळातली ही भांडी पाहून बच्चे कंपनी तर खुश झालीच.. शिवाय पालक मंडळी देखील जुन्या आठवणींमध्ये हरवून गेली..