गजानन देशमुख, झी मीडिया हिंगोली : हिंगोलीमध्ये एक आगळी-वेगळी भाऊबीज पार पडली. पाहुयात काय वेगळं होतं या सोहळ्यामध्ये....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगोलीत रंगलेला हा सोहळा होता विधवा महिलांना त्यांचा बहिणीचा मान मिळवून देण्यासाठी. संजय काटकर कुटुंबियांच्या वतीने गावातील लेकी बाळी सुना, आत्यांसाठी सामूहिक भाऊबीजेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जवळपास तीनशे महिलांनी त्यांच्या भावंडांना सामूहिक पद्धतीनं ओवाळलं.


विशेष म्हणजे या सोहळ्यामध्ये विधवा महिलांना सामावून घेण्यात आलं होतं. समाजात विधवा महिलांना आजही धार्मिक विधींपासून दूर ठेवलं जातं. हीच अन्यायी प्रथा मोडून काढण्यासाठी विधवा महिलांनी भाऊबीजेच्या या सोहळ्यात त्यांच्या भावांना ओवाळलं. तसंच जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनाचा मानही त्यांना देण्यात आला.


जुन्या बाल मैत्रिणी आणि शेकडो आप्तस्वकीय एकाच वेळी एका छताखाली आल्यानं या सोहळ्याला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. या सोहळ्यात उपस्थित तीनशे महिलांना साडी-चोळी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


विशेष म्हणजे या भाऊबीजेच्या निमित्ताने गावातील लेकी, सुना, आत्यांना मूळ पत्रिका पाठवून सन्मानपूर्वक भाऊबीजेला येण्यासाठी आमंत्रण आठवण्यात आलं होतं.


या सोहळ्याच्या निमित्तानं विधवा महिलांच्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली. पुढच्या काळात त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी अख्खं गाव एकत्र येऊन प्रयत्न करणार आहे.