प्रफुल्‍ल पवार, झी मीडिया, रायगड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्‍या भाऊचा धक्‍का ते मांडवा या रो रो सेवेसाठी, मांडवा इथल्या टर्मिनल आणि जेटीचं काम अंतिम टप्प्‍यात आहे. पुढल्या महिन्‍यात हे काम पूर्ण होऊन, ही बारमाही प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्‍या सागरमाला प्रकल्‍पाअंतर्गत पहिल्‍या टप्‍प्‍यात भाऊचा धक्‍का ते मांडवा अशी प्रवासी रो रो सेवा सुरू करण्‍यात येणार आहे. त्यासाठी मांडवा बंदरात सर्व सोईंनी युक्‍त टर्मिनल उभारण्‍याचं काम अंतिम टप्‍प्‍यात आहे. या प्रकल्‍पाचं 95 टक्के काम झालं असल्याची माहिती, महाराष्‍ट्र मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेला 135 कोटी रूपयांचा हा प्रकल्‍प आहे. रो रो सेवेमुळे बारमाही प्रवासी तसंच वाहनांची वाहतूक शक्‍य होणार आहे. 


दरम्यान, ज्या ठिकाणी बोटी उभ्‍या राहणार आहेत त्‍या ठिकाणी मोठया प्रमाणावर गाळ साचतो, त्‍यामुळे बारमाही वाहतुकीबाबत प्रवाशांना शंका आहे. मात्र, संपूर्ण अभ्‍यास करूनच प्रकल्‍पाची उभारणी करण्‍यात आल्‍याचं मेरीटाईम बोर्डानं सांगितलंय.  


हा प्रकल्‍प सुरू झाल्‍यास कोकणात जलवाहतुकीचं पर्व पुन्‍हा नव्‍यानं सुरू होणार आहे. सोबतच पर्यटन वाढीलाही चालना मिळणार आहे.