भाईंदर: बऱ्याचदा पोलिसांकडे जाण्याआधी नागरिक कायदा आपल्या हातात घेत असल्याचे अनेक प्रसंग ऐकत असतो पाहात असतो. असाच एक प्रकार घडला आणि त्यामुळे एका युवकाचा जीव गेला आहे. 2 युवकांना चोर समजून अमानुषपणे मारहाण करण्य़ात आली आहे. ही मारहाण इतक्या अमानुषपणे करण्यात आली की त्यामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाईंदर पूर्व इंदिरानगर परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. याघटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. रात्री जवळपास 3 ते 4 वाजताच्या  सुमारास ही घटना घडली. 
 
मीरा भाईंदर मनपाच्या मैदानात काही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी फिरत असताना  त्यांनी सकाळी हा युवकाचा मृतदेह पाहिला. इंदिरा नगरच्या समोर असलेल्या या मैदानात मृतदेह पाहून एकच खळबळ उडाली. नागरिकांनी याची माहिती तातडीनं नवघर पोलिसांना दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. 


पोलिसांनी युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीसांनी अधिक तपास करत  मारहाण करणाऱ्या 7 ते 8 संशयित युवकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांकडून चौकशी करून गुन्ह्यात सहभागी असलेल्या चार आरोपींना अटक बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणी पुढील तपास नवघर पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.