Bhayandar-Vasai Ro Ro Service: वसई ते भाईंदर दरम्यान प्रवासी फेरीबोट सेवा मंगळवारी 20 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वसई खाडीत प्रायोगिक तत्वावर रो-रो प्रवासी फेरीबोट सुरू करण्यात येत आहे. या प्रवासी फेरी बोटीचे तिकिट दर किती असतील? जाणून घेऊया सर्व काही 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअतंर्गंत भाईंदर पश्चिम ते वसई किल्ला रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय 2016 मध्ये घेण्यात आला होता. मात्र, काही कारणास्तव हा प्रकल्प रखडला होता. वसई जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर रोरो सेवा चालवण्यासाठी पुन्हा गती मिळाली. त्यानंतर सुवर्णदुर्ग या खासगी कंपनीला कंत्राटही देण्यात आले. एकाच फेरीत 100 प्रवासी आणि 33 गाड्या नेण्याची क्षमता फेरीबोटीची आहे. 


वसई ते भाईंदर असा रस्तेमार्गाने प्रवास करण्यासाठी एक तासांचा वेळ लागतो. तर, या प्रवासी बोटीमुळं आता अवघ्या 15 मिनिटांत भाईंदरहून वसईत पोहोचता येणार आहे. वेळेच्या बचतीबरोबरच इंधनाचीही बचत होणार आहे. जलवाहतूकीचा पर्याय उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


रो-रो बोटीची वाहन क्षमता 50 दुचाकी, 30 चारचाकी वाहनांची असणार आहे. तसंच, प्रवासी क्षमता 100 पेक्षा जास्त असणार आहे. तसंच, कंपनीकडून या रो-रो बोटीला जान्हवी असे नाव देण्यात आले आहे. नागरिकांना या बोटीतून सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांना प्रवास करता येणार आहे. सध्या 13 फेऱ्यांची वेळ ठरवण्यात आली आहे. कालांतराने नागरिकांचा प्रतिसाद वाहून फेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. 


रो-रो सेवेसाठी असे असतील तिकिट दर


12 वर्षांवरील प्रवासी-25
12 वर्षाखालील प्रवासी-15
दुचाकी (चालकासह)-50
तीनचाकी वाहन (चालकासह)-70
चारचाकी वाहन (चालकासह)-140
बस किंवा ट्रक (चालक व सहायकासह)- 300 


अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या या रो-रो फेरीबोट सेवेमुळं भाईंदर आणि वसई ही शहरे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. सध्या वसईहून भाईंदरला जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वसई ते भाईंदर रस्तेमार्गा साधारण 38 किमीपर्यंत आहे. त्यामुळं हे अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागतो. मात्र, आता नागरिकांसाठी एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. फाउंटनला होणारी वाहतुक कोंडी टाळून जलमार्गाने भाईंदरला पोहोचता येणार आहे. जलमार्गे हे अंतर अवघ्या 3.57 किलोमीटर येणार आहे. रो-रो बोटीतून अवघ्या 15 मिनिटांत वसई ते भाईंदर अंतर कापता येणार आहे.