जावेद मुलानी, बारामती :  कोरोनामुळे एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाल्यानंतर बारामतीत आता भिलवाडा पॅटर्न राबवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हा पॅटर्न राबवण्यात येणार असून बारामती शहर आणि तालुक्याच्या सीमाही सील करण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामतीत गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शहर आणि तालुक्यात आता कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. आदेश मोडून जे लोक घराबाहेर पडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. घरीच बसून आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असं आवाहन पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे,


बारामतीत आधी एका रिक्षा चालकाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर एका भाजी विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली. भाजी विक्रेत्याच्या कुटुंबीयांची चाचणी केली असता, त्याचा मुलगा, सून आणि दोन नातींनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. कोरोनामुळे भाजीविक्रेत्याचा गुरुवारी पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्याला अर्धांग झाल्यानं त्या आजारावरही त्याच्यावर उपचार सुरु होते.


 



काय आहे भिलवाडा पॅटर्न?


देशभरात भिलवाडा पॅटर्नचं कौतुक होत असलेला भिलवाडा पॅटर्न नेमका काय आहे याबाबतही लोकांमध्ये उत्सुकता आहे. भिलवाडा पॅटर्नमध्ये काही महत्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्या पुढीलप्रमाणे


  1. मार्च महिन्यात जेव्हा कोरोनाचा फैलाव भिलवाडा शहरात सुरु झाला तेव्हा घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करण्यात आली.

  2. सुमारे एक लाख लोकांची तपासणी करण्यात आली.

  3. तपासणीसाठी विशेष टीम तयार करण्यात आल्या होत्या.

  4. कोरोनाची लागण झालेल्यांना तातडीने दूर करण्यात आले आणि त्यांच्यावर उपाचार सुरु करण्यात आले.

  5. कोरोनाबाधित आढळले त्यांच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले. कडेकोट बंदोबस्त असल्याने कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेले लोक घराबाहेर पडू शकले नाहीत.

  6. कोरोना रुग्णांवर जे उपचार सुरु आहेत, त्याची माहिती मागवून त्याप्रमाणे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे रुग्णही बरे झाले.