कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी देशभरात अटक सत्र सुरु
कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी राज्यभरात अटकसत्र सुरू आहे.
पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी राज्यभरात अटकसत्र सुरू आहे. पुणे पोलिसांनी अॅडव्होकेट सुरेंद्र गडलिंग तसंच रिपब्लिकन पँथर्स चे कार्यकर्ते सुधीर ढवळे यांच्यासह चौघांना अटक केली आहे. सुरेंद्र गडलिंग यांना नागपूरमधून तर ढवळे यांनी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीनं जेकब राणा आणि रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक केली आहे. जेकब हे मानवी हक्क कार्यकर्ते आहेत.
सुधीर ढवळे आणि इतरांनी पुढाकार घेऊन 30 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातल्या शनिवार वाडा येथे एल्गार परिषद घेतली होती. या परिषदेच्या आयोजनाबाबत 8 जानेवारी 2018 रोजी पुण्यातल्या विश्राम बाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजकीय प्रभावाखाली ही कारवाई केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तर मनोहर भिडे गुरुजी यांना वाचवण्यासाठी सुधीर ढवळे यांना अटक करण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन पँथर्सच्या कार्यकर्त्यांनी केलाय.
काय घडलं होतं?
१ जानेवारीला कोरेगाव भीमा गावातल्या भीमा कोरेगावच्या ऎतिहासिक लढाईच्या द्विशतक पूर्तीनमित्त भीमा कोरेगाव इथल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंची गर्दी जमली असताना दंगल उसळली. काही समाजकंटकांनी जोरदार दगडफेक सुरू केली. नेमका त्याचवेळी काही कामानिमित्त रस्त्यावर आलेल्या याच गावातील राहुल फटांगडे या तरुणाला राहुलला दगड लागले. त्यात कोणत्याही गटाचा भाग नसलेल्या राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. भीमा कोरेगाव प्रकरणा मागे पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी तीन ते चार दिवस आधी चिथावणी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.