मुंबई : भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा २४ वर पोहोचला आहे. पहिल्या मजल्यावर आणखी काही जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अनधिकृत इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दंड आकारणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भिवंडी इमारत दुर्घटनास्थळावरील थांबवण्यात आलेले मदत कार्य पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आता जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा बाजूला करण्याचे काम केले जात आहे. पहिल्या मजल्यावर अजून १५ ते १७ व्यक्ती  अडकलेल्या आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आलं असून ज्यात २४ जणांचा मृत्यू झालाय तर २० जखमी आहेत. 



पहिला मजला पूर्णतः दबला गेला असल्यानं अडकलेल्या लोकांपैकी कुणी जीवंत सापडेल का याबाबत साशंकता आहे. त्यामुळंच जेसीबीद्वारे धोकादायक अवस्थेत असलेले टेरेसचे छत पाडलं जात असून त्यानंतर ढिगारा हलवला जाणार आहे. दरम्यान मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


यावेळी सर्व अनधिकृत इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांच्यावर दंड आकारून त्यांना नियमित करायला काही हरकत नाही, असेही त्यांनी सांगितले. तर सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत दिली जाईल आणि संबंधित इमारत अधिकृत असेल तर मृतांच्या कुटुंबियांना आणखी ४ लाख दिले जाणार आहेत.