भिवंडी लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
भिवंडी मतदारसंघाची हवा काय सांगते. तिथे काय राजकीय घडामोडी सुरू आहेत.
कपिल पाटील, झी मीडिया, भिवंडी : भिवंडी मतदारसंघाची हवा काय सांगते. तिथे काय राजकीय घडामोडी सुरू आहेत. पाहुया लेखाजोखा भिवंडीचा. 2014 साली भिवंडी लोकसभा कॉग्रेसच्या वाट्याला गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे भिवंडी तालुका अध्यक्षपद भूषवलेले कपिल पाटील यांनी तडकाफडकी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि लोकसभेची उमेदवारी मिळवली. २०१४च्या मोदी लाटेत कपिल पाटील तब्बल ४ लाख ११ हजार मतं मिळवत विजयी झाले. तर काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांना ३ लाख १ हजार ६२० मतं मिळाली होती.
मुरबाड, कल्याण पश्चिम, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, भिवंडी ग्रामीण आणि शहापूर असे सहा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतात.. त्यापैकी तीन जागा भाजपच्या, दोन जागा शिवसेनेच्या आणि एक जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत या मतदारसंघात शिवसेना भाजपमध्या सातत्यानं खटके उडतायत. त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गनिमी काव्याचे राजकारण पाहायला मिळालं.
भाजपला धडा शिकविण्यासाठी शिवसेनेनं कॉग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केलाय. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीशी घरोबा करत शिवसनेने जिल्हा परिषद अध्यक्षपद पटकावलं. तर भिवंडी महापालिकेत शिवसनेने कॉग्रेसला मदत केली. कॉग्रेसचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर झाला. हे राजकीय गणित लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकवण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आहेत.
या मतदारसंघात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा प्रभाव आहे. काँग्रेसची सगळी भिस्त ही भिवंडी शहरातल्या ४ ते ५ लाख मुस्लिम मतांवर आहे. तर भिवंडीत समाजवादी पार्टीची चांगली ताकद आहे.
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, आणि शिवसेना अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर कपिल पाटील यांना भाजपनं जिल्हाप्रमुख केलंय. त्यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षानं टाकलीय. भिवंडी पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप पिछाडीवर होती. आता 2014 इतकी मोदी लाट नाही, त्यात युती झाली नाही तर भाजपला फटका बसण्याची चिन्हं आहेत.
गेल्या साडेचार वर्षात भिवंडी लोकसभा मतदारसंघात हवी तशी विकासकामं झाली नाहीत. काही ठिकाणी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून विकासकामांचं भूमिपूजन झालं. पण त्या कामांना गती नाही. खासदार कपिल पाटील यांनी खासदार निधीला शहरी भागात प्राधान्य दिल्यानं ग्रामीण भागात त्यांना याचा फटका बसू शकतो. तसंच भाजपमधलाच एक वर्ग कपिल पाटील यांच्यावर सुरुवातीपासूनच नाराज आहे. त्यामुळे यंदा भाजपची कसोटी लागणार आहे.