शिर्डी : मुलांचे लग्न होत नसल्याने त्यांचे लग्न जमवून देतो. तसेच दुर्धर आजार बरे करुन देतो, असे सांगून जादूटोणा करत लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा मल्लिअप्पा ठका कोळपे (४५)  आणि त्याला सहकार्य करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याबाबत अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली. त्यानंतर संगमनेर पोलिसांनी रंगेहात पकडत जादूटोणा विधेयक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील मल्लिअप्पा कोळपे हा बाबा मी खंडोबाचा भक्त असून मी पुजाविधी करुन लग्न जमत नसलेल्या मुलांची लग्ने जमवून देतो, असे सांगत होता. तो अनेकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती सांगत भोंदूगिरी करत असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य हरिभाऊ उगले यांना मिळाली. या भोंदूबाबाचे स्टींग ऑपरेशन केले. 
 
मुलाचे लग्न होत नाही. घरात अडीअडचणी आहेत, असे खोटे कारण सांगून भोंदूबाबाला संपर्क साधला. यावेळी बाबाने तुमच्या मुलाचे लग्न होण्यासाठी तुमच्या घरात काही विधीवत पुजा करावी लागेल. विधीसाठी सात हजार रुपये आणि गाडीभाडे असा दहा हजार रुपयांचा खर्च मागितला. उगले यांनी ही बाब महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे निदर्शनास आणून दिली. त्यानंतर संगमनेर पोलिसांच्या मदतीने संगमनेर तालुक्यातील चिखली या गावी जावून बाबा पुजा करत असतांना त्याला रंगेहात ताब्यात घेतले.


पोलिसांनी या भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना घटनास्थळावरुन पुजा साहित्य लिंबू मिरचीसह ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात जादुटोणा विधेयक कलम २ नुसार गुन्हा दाखल करत ताब्यत घेतले, अशी माहिती श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक दीपाली काळे यांनी दिली.