ED Custody Sadanand Kadam in Sai Resort case : साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना ईडीने खेडमधल्या निवासस्थानातून  ताब्यात घेतले आहे. दापोलीतल्या साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचं समजत आहे. सदानंद कदम हे साई रिसॉर्टचे मालक आहेत. तसेच शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. ईडीचं पथक सदानंद कदम यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील कथित बेकायदा साई रिसॉर्ट्स बांधकाम प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी व्यावसायिक सदानंद कदम यांनी ताब्यात घेतले आहे. कदम हे सत्ताधारी शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू आणि विरोधी पक्ष शिवसेनेचे (UBT) माजी मंत्री अनिल परब यांचे माजी सहकारी आहेत. या रिसॉर्ट्स प्रकरणाच्या पुढील तपासासाठी ईडीचे एक पथक रत्नागिरीहून कदम यांच्यासोबत मुंबईला रवाना झाले आहे.


दरम्यान, राज्यातील सत्ताधारी शिंदे शिवसेना आणि भाजप युती सरकारने ईडीच्या कारावाईचे स्वागत केले आहे. तर ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून विरोधकांना ईडीच्या माध्यमातून टार्गेट करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. दापोलीतील साई रिसार्ट प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला होता. सोमय्या यांनी ईडीकडे याची तक्रार केली होती. त्यानंतर ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.



काय आहे हे प्रकरण?


दापोलीतील मुरुड समुद्र किनाऱ्यावर साई रिसॉर्ट उभारण्यात आले आहे. या रिसॉर्टवर भाजपनेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत हे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्याआधी सदानंद कदम आणि अनिल परब यांची यात भागिदारी असल्याचे सोमय्या यांनी आरोप केला होता. मात्र, सोमय्या यांचा आरोप अनिल परब यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, या रिसॉर्ट प्रकरणी दापोली पोलीस स्टेशनमध्ये माजी मंत्री अनिल परबांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  


दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रुपा दिघे यांनी फिर्याद दिल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल परब यांनी खोटी कागदपत्रे, दर करुन शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे तत्कालीन मालमत्ता धारक अनिल परब यांनी इमारत पूर्ण नसतानाही इमारत पूर्ण असल्याचे भासवून ग्रामपंचायत मुरुड दापोली यांची पर्यायाने शासनाची फसवणूक केलेली आहे, असे म्हटले आहे. 


राज्यात सत्तात्तंर होताच सरकारने हे रिसॉर्ट पाडकामाचे आदेश दिले होते. बांधकाम पाडण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या. त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये वर्गही करण्यात आला आहे. त्यामुळे रिसॉर्ट पाडण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच अनिल परब यांच्यासह सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. आता सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतल्याने या प्रकरणातून काय निष्पण होणार याची उत्सुकता आहे.