रायगडमधील थळ प्रकल्पात मोठा स्फोट; दोन कामगार जखमी, एक गंभीर
blast at Thal project in Raigad : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ प्रकल्पात मोठा स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार कर्मचारी जखमी झाले आहेत.
अलिबाग : blast at Thal project in Raigad : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ प्रकल्पात मोठा स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार कर्मचारी जखमी झाले आहेत. यातील एकजण भाजला असून त्याला तातडीने मुंबईत अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे. आज सकाळच्या सुमारास नियमित कामकाज सुरू असताना ही घटना घडली. या घटनेच्यावेळी मोठा स्फोट झाल्याने परीसरात परिसरात भीतीचे वातावरण आहे. (Big blast at Thal project in Raigad; Two workers injured, one seriously)
अमोनिया विस्तारीत प्रकल्पात काम सुरू असताना अचानक गॅसने पेट घेतला आणि त्यावेळी स्फोटासारखा मोठा आवाज झाला. या आगीत विजय माळी हा कर्मचारी गंभीररित्या भाजला. त्याच्या अंगावर अमाईड केमिकल उडाल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर आरसीएफच्या कुरूळ येथील रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. तर दुसरा कर्मचारी सिदधेश भगत किरकोळ जखमी झाला आहे. त्याला मोठा धक्का बसला असल्याचे सांगितले जात आहे.
या दुर्घटनेतील स्फोटाचा आवाज परीसरातील थळ , नवगाव या गावांमध्ये ऐकू आला. यावेळी जमीन हादरली. आम्ही घाबरून गेलो होतो, असे तेथील रहिवाशांनी सांगितले. यासंदर्भात आरसीएफच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता त्यानीही या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र घटना किरकोळ असून मोठा आवाज झाल्याचे त्यांनी सांगितले. नियमित कामकाजात अशा घटना घडत असतात असेही सांगण्यात आले.