Rs 7015 Crore Project Approved Big Boost To Maharashtra: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असतानाच केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासंदर्भात अनेक निर्णय झटपट घेतले जात असल्याचं दिसत आहे. असं असतानाच आता राज्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाला केंद्रातील मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे. महाराष्ट्रातील दोन नद्या जोडल्या जाणार असून यासाठी केंद्र सरकारने 7 हजार 15 कोटी रुपये मंजूर केले आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.


राज्यपालांचे मानले आभार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या मंजुरीचं पत्र राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य सरकारला दिलं असून हे पत्र फडणवीसांनी शेअर केलं आहे. "वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा माननिय राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली आहे. मी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा अतिशय मनापासून आभारी आहे," असं फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


सुमारे 7015 कोटी रुपये दिले


"नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून 10.64 TMC पाणीवापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला होणार आहे," असंही फडणवीस पोस्टमध्ये म्हणाले आहेत. तसेच, "सुमारे 7015 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे," असं सांगतानाच फडणवीस यांनी, "राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे," असंही नमूद केलं आहे.



'हे' 1 डझनहून अधिक तालुके होणार सुजलाम-सुफलाम


नार-पार या नाशिक जिल्ह्यामधील पेठ, सुरगाणा तालुक्यांमधील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची 'नार-पार-गिरणा नदी जोड' योजना आहे. यासाठी साधारणपणे साडेसहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांना फायदा होणार आहे. यामध्ये कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील तब्बल 7 तालुक्यांना याचा फायदा होणार आहे. एरंडोल, धरणगाव, अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव, भडगाव, पाचोरासारख्या तालुक्यांमधील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. धुळे जिल्ह्यातील काही भागालाही या योजनेचा मोठा लाभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे.