Firing on Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला मुंबईतील वांद्रे भागात ही घटना घडली. बाबा सिद्दीकी हे त्यांचा मुलगा झिशान याच्या कार्यालय परिसरात असताना, 3 जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यातली 1 गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागली होती. त्यांना तातडीनं लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या हत्येमागे यूपी, हरियाणा कनेक्शन समोर आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लेखोरांपैकी एक जण उत्तरप्रदेशचा असून, दुसरा हरियाणाचा आहे. तर तिसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेताहेत. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस रात्री लिलावती रुग्णालयात दाखल झाले. तिथे त्यांनी घटनेची माहिती घेतली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारचे आपले सगळे दौरे रद्द करुन ते तातडीनं मुंबईसाठी रवाना झाले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. नुकतेच बाबा सिद्दीकी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन, अजित पवारांच्या पक्षात दाखल झाले होते. राजकारणी असलेले बाबा सिद्दीकी यांचे बॉलिवुडशीही चांगले संबंध होते. यामुळे बॉलिवुलडलाही या घटनेनं मोठा धक्का बसलाय. 


मुंबईत गेल्या आठवडाभरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांची हत्या झालीय. अवघ्या सात दिवसांपूर्वी भायखळ्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या झाली होती. त्यानंतर आज बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. या दोन्ही हत्यांमुळं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये. बाबा सिद्दीकी हे मुंबईतले दिग्गज नेते मानले जातात. सिद्दीकींच्या हत्येमुळं मुंबईतल्या राजकीय वर्तुळात भीतीचं वातावरण आह.


बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे असं ट्विट अजित पवार यांनी केले आहे. 


एकनाथ शिंदे म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी पोलिस आयुक्तांशी बोललो असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच फरार आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 


राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. 


कोण आहेत बाबा सिद्धीकी?


बाबा सिद्दीकी हे मुंबईतील सर्वात चर्चेत असणारे नेते आहेत. बाबा सिद्दीकी दरवर्षी मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात. त्यांच्या या  इफ्तार पार्टीला बॉलिवूडचे सुपरस्टार आवर्जुन हजेरी लावतात. सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत.