विशाल करोळे / औरंगाबाद :  Aurangabad university exam : परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाच्या परीक्षांचा गोंधळ दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर विद्यापीठ प्रशासनाने सर्व पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. परंतु दोन वर्षाच्या अंतराने केलेल्या या नियोजनात अनेक त्रुटी आढळून आल्याचे दिसून येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमध्ये विद्यापीठाच्या परीक्षांचा गोंधळ झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षेचे नियोजनं फसल्याने विद्यार्थांचे हाल झालेत. एकाच बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविण्याची वेळ आल्याने परीक्षेचे तीनतेरा वाजलेत. हा सगळा प्रकार विजयेंद्र काबरा समाजकार्य कॉलेजमधील घडला. त्यामुळे पालकवर्गातूनही संताप व्यक्त होत आहे.



आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. ऐनवेळी विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या शेकडोंनी वाढल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, तसेच परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला आल्यामुळे एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविण्याची वेळ परीक्षा केंद्र संचालकांवर आली.


उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली दखल


 सकाळी नऊ वाजता सुरू होणारा पेपर बारा वाजेपर्यंत सुरू झालेला नाही. मात्र यातून मार्ग काढू, तसेच विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली.


दरम्यान 'झी 24 तास'ने ही बातमी दाखवताच तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तातडीने दखल घेतली. 'झी 24 तास'ने बातमी दाखवताच चौकशी करून तासाभरात कारवाई करु असे उदय सामंत यांनी आश्वासन दिले.