नवी मुंबई : CIDCO Lottery 2022 : घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी. सिडकोच्या 5730 घरांसाठीच्या लॉटरीची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून घर नोंदणी सुरु झाली आहे. त्यामुळे घरांच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नागरिकांना नवी मुंबईत घरांसाठी अर्ज करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

CIDCO ने सामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी ही लॉटरी काढली आहे. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने 5 हजार 730 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 26 जानेवारीपासून लॉटरीसाठी नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही माहिती दिली. नवी मुंबईतील कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी आदी ठिकाणी ही घरे असणार आहेत.


नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांची ‘महागृहनिर्माण’योजना आहे. या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे घरे उपलब्ध होणार आहेत. घरांच्या लॉटरीसाठी 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. 



24 फेब्रुवारी 2022 रात्री आठ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.  सिडकोच्या https://lottery.cidcoindia.com/App/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. गुरुवार 27 जानेवारी 2022, दुपारी 12 वाजल्यापासून घरांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.  25 फेब्रुवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार आहेत. 


5730 घरांपैकी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 1524  घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी तर 4206 सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. कोरोना महासाथीनंतर ही लॉटरी निघणार असल्यामुळे घर खरेदीच्या प्रतिक्षेत असलेल्यांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. 


मुंबईत म्हाडाची घरांसाठी लॉटरी 


दरम्यान, जुलै महिन्यांत मुंबईतील गोरेगाव परिसरात 4 हजार घरांची म्हाडा लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून याबाबतची तयारी सुरु आहे.  मुंबईच्या उपनगरात म्हाडाकडून सर्वसामान्यांना परवडतील अशी वन बीएचके घरे बांधली जात आहेत.


घरांच्या लॉटरीत अत्यल्प गटाकरिता सुमारे दोन हजार घरांचा समावेश असणार आहे. पहाडी गोरेगाव येथे वन बीएचके आकाराची असणारी ही घरे अगदी परवडणाऱ्या किंमतीत म्हणजे 22 लाखांत उपलब्ध होणार आहेत. 


गोरेगाव येथे बांधण्यात येणारी 1947 घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवूनच हा प्रकल्प  साकारला  जात आहे. तर लॉटरीतील उर्वरित घरे ही उन्नत नगर येथे असणार आहेत.