सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तिक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने येत्या शैक्षणिक वर्षापासून (New academic year) इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांची रचना बदलली आहे. इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले असून तीन ते चार विषयांसाठी एकच पुस्तक राहणार आहे. तसंच प्रत्येक पुस्तकामध्ये एक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आलं आहे. त्या पानाच्या वर माझी नोंद असे लिहिण्यात आलं आहे. त्यावर बालभारतीचा (Balbharti) लोगोही छापण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच शाळांना वाटप
बालभारतीच्या नवीन पुस्तकांचे पहिल्या टप्प्यातील छपाईचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे शाळांना वाटप सुरू केले जाणार आहे. सध्या ही पुस्तके बालभारतीच्या गोडाऊनमध्ये आहेत. त्याचे वाटप जिल्हा, तालुका व शाळा अशा टप्प्यांमध्ये होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून (Education Department) केला जात आहे. विद्यार्थ्यांसाठी जुनी पुस्तकेही बाजारात उपलब्ध असतील.


पाठिवचं ओझं कमी होणार
पाठ्यपुस्तकांच्या नव्या रचनेनुसार तीन-चार विषयांची पुस्तके चार भागांत एकत्रित केली जाणार आहे. पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कमीत-कमी वह्या आणाव्यात यासाठी प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आलं आहे. या पानावर दोन्ही बाजूला धड्याशी संबधित नोंदी करता येऊ शकतात. वर्गामध्ये शिक्षकांकडून धडा शिकविला जात असताना विद्यार्थ्यांनी त्यासंदर्भातील नोंदी वहीच्या पानावर करणे अपेक्षित आहे. काही अवघड शब्द, संकल्पना, आकृत्या, काही महत्वाच्या पुस्तकाबाहेरील नोंदी करता येऊ शकतात.


वर्गामध्ये वह्या आणाव्याच लागणार 
गृहपाठ किंवा वर्गपाठासाठी स्वतंत्र वह्या करण्याचा पर्याय शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे वहीचे पान पुस्तकामध्ये जोडले गेले असले तरी संबंधित विषयांच्या वह्या वर्गात आणाव्या लागणार आहेत. त्यामुळे ओझे कमी करण्यासाठी वहीच्या पानाचा उपयोग होणार नाही. पण प्रत्येक विषयानुसार पुस्तकाचे चार भाग करण्यात आल्याने पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे.



एकाच रंगाचा गणवेश
दरम्यान, पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकाच रंगाचा गणवेश ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट असा गणवेश असेल. 3 दिवस राज्याचा आणि 3 दिवस शाळेचा गणवेश विद्यार्थी वापरतील. राज्यातील 64.28 लाख विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. गणवेशांसाठी 66.97 कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.