विद्यार्थी आणि पालकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी! आता तिसरीनंतर ढकलगाडी बंद?
राज्यात तिसरीपासून पुन्हा परीक्षा? शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे संकेत
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : विद्यार्थी आणि पालकांसाठी (Student and Parents) आताची सर्वात मोठी बातमी. राज्यात तिसरीपासून पुन्हा परीक्षा होणार असल्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले आहे. राज्यात आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास केलं जात होतं. ती ढकलगाडी आता बंद होण्याची शक्यता आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची राज्यातील शिक्षण तज्ज्ञांशी यासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवी पर्यंत पास केलं जात होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं.
त्यामुळे शिक्षण तज्ज्ञांबरोबर चर्चा करुन शिक्षण हक्क कायद्यात काही बदल केले जाऊ शकतात का विषयी चर्चा सुरु आहे. त्यानुसार तिसरीपासून परीक्षा घेण्याचा सूतोवाच केला जात आहे.
परिक्षा घेतली तरी आम्ही मुलांना अनुतिर्ण करणार असा त्याचा अर्थ काढण्यात येऊ नये. हा निर्णय केवळ चर्चेच्या पातळीवर असून या संदर्भात शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच अंतीम निर्णय घेतला जाईल असंही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.