Rajya Sabha Election : आताची मोठी राजकीय घडामोड, संभाजीराजे तातडीने मुंबईकडे रवाना, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट?
राज्यसभा निवडणुकीबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सहाव्या जागेसाठी ही उत्कंठा आहे. संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना कोणाचा पाठिंबा मिळणार याची उत्सुकता आहे.
कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने सहावा उमेदवार देण्याचे जाहीर केले. तसेच या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्याची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी आहे, असे असताना आताच एक मोठी बातमी समोर आली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी सकाळी आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा मान राखतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर संभाजीराजे छत्रपती हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संभाजीराजे कोल्हापूरहून मुंबईला निघाले आहेत. आज सायंकाळी मुख्यमंत्री आणि संभाजीराजे याची भेट होणार असल्याची माहिती मिळतेय.
या भेटीत संभाजीराजे याच्या अपक्ष उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान, संभाजीराजे हे काही केल्या शिवबंधन बांधणार नाहीत. त्यामुळे त्यांना शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याला संभाजीराजे देखील सकारात्मक प्रतिसाद देवून शिवसेनेचा पाठिंबा स्वीकारतील असे बोलले जात आहे. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी भेट झाल्यानंतरच अधिकृत घोषणा केली जाईल असेही या सूत्रांनी सांगितले.