Pune Vidhan Sabha Election 2024 : पुणे भाजपमध्ये उमेदवारीवरुन मोठी यादवी सुरु होण्याचे संकेत आहेत. कसबा मतदारसंघातून उमेदवारीसाठी कुणाल टिळक, हेमंत रासने आणि धीरज घाटेंनी दंड थोपटलेत. तिघंही आपणच उमेदवार असा दावा करतायेत. दुसरीकडं कोथरुडमधून चंद्रकांतदादांनाही भाजपच्या अमोल बालवडकरांनी आशीर्वाद यात्रा काढून आव्हान दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेच्या उमेदवारीसाठी पुणे भाजपात मोठा संघर्षाला तोंड फुटलंय. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विघानसभा मतदारसंघात उमेदवार मिळवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झालीय. पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या हेमंत रासनेंनी पुन्हा उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवलेत. तर माजी आमदार आणि स्वर्गीय भाजप नेत्या मुक्ता टिळक यांचे पूत्र कुणाल टिळक यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी कंबर कसलीय. त्यांनी मतदारसंघाच बॅनरबाजी सुरु केलीय. गेल्या दीड वर्षांपासून कसबा मतदारसंघाची बांधणी करत असल्याचा दावा कुणाल यांनी केलाय.


हेमंत रासने यांनीही उमेदवारीसाठी आपल्याच नावाला पसंती असल्याचा दावा केलाय. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही कसबा मतदारसंघावर दावा केलाय. शहराध्यक्ष म्हणून काम करताना कसबा मतदारसंघाशी घट्ट नाळ जुळल्याचं घाटे सांगतायेत
मेधा कुलकर्णी राज्यसभेच्या खासदार झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी मैदान साफ आहे असं वाटत होतं. पण तो चंद्रकांतदादा समर्थकांचा भ्रम ठरलाय. भाजपच्या अमोल बालवडकर यांनी कोथरुडमध्ये आशीर्वाद यात्र सुरु केलीय.


बालवडकरांच्या यात्रांपासून बडे नेते लांब राहत असले तरी त्यांनी चंद्रकांतदादांना एकप्रकारे आव्हान दिल्याचं सांगण्यात येतंय. पुण्यात भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नाही हे मात्र सिद्ध झालंय. या अंतर्गत संघर्षाचं बंडखोरीत रुपांतर होणार नाही याची खात्री भाजपश्रेष्ठींना घ्यावी लागणार आहे.