`कितीही परखड बोललं तरी राजाने ते सहन केलं पाहिजे, लोकशाहीत...`; गडकरींचं सूचक विधान
Nitin Gadkari In Pune MIT Speech: नितीन गडकरींनी पुण्यातील एमआयटीमध्ये दिलेल्या भाषणामध्ये भारतीय लोकशाहीवर भाष्य केलं. लोकशाहीमध्ये काय अपेक्षित असतं याबद्दल गडकरी बोलले.
Nitin Gadkari In Pune MIT Speech: लोकशाहीत सर्वोच्च पदावर प्रखर टीका सहन करण्याची क्षमता पाहिजे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी पुण्यात एम. आय. टी. येथे गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात गडकरी बोलत होते. यावेळेस गडकरींनी, राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावे. राजाने प्रखर टीकेवर चिंतन करावे. टीका सहन करणे हीच राजाची सर्वात मोठी परीक्षा असते असंही गडकरी आपल्या भाषणात म्हणाले.
लोकशाहीकडून हीच खरी अपेक्षा असते
"आपल्याला लोकशाहीकडून अपेक्षा आहे, साहित्यिकांबद्दल, कवीबद्दल, विचारवंतांकडून तरी अपेक्षा आहे की त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले पाहिजेत. लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा कोणती असेल तर राजाच्या विरोधात कितीही कोणीही परखडपणे विचार मांडले तरी ते राजाने सहन केले पाहिजे. त्या विचारावर चिंतन केले पाहिजे हीच खरी लोकशाहीमधील अपेक्षा असते. लहानपणी आई मला नेहमी सांगायची निंदकाचे घर असावे शेजारी! आपल्याला दिशा देणारा माणूस जो आहे तो आपल्याला आपले काय चुकलं काय बरोबर आहे ते सांगणार आहे," असं गडकरी म्हणाले.
समाज सतत बदलतो
"आपली लोकशाही जगात सर्वात मोठी आहे. समाजाच्या देशाच्या हितासाठी आहे. जे आहे ते मांडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेले आहे. आपल्याला विचार स्वतंत्र आहे," असं गडकरींनी म्हटलं. "समाज बदलत असतो जे काल आहे ते आज नाही जे आज आहे ते उद्या नाही," असंही गडकरींनी सांगितलं.
नक्की वाचा >> ₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, 'तुम्ही कार..'
व्यक्ती गुणवत्तेने मोठी होते
"आज कोणत्याही व्यक्तींमध्ये जात, धर्म, पंथ, लिंग यामध्ये सामजिक विषमता दिसत असेल तर ती चिंतेची बाब आहे. मात्र व्यक्ती या सर्व गोष्टींनी मोठी होत नाही तर तिच्या गुणवत्तेने मोठी होते," असं प्रतिपादन गडकरींनी केलं. राष्ट्रीय पुन:निर्माण स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रबोधन उच्च, नीच, जातीयता भावना नष्ट झाली पाहिजे. जोवर सामाजिक समता, आर्थिक समता येत नाही तोवर राष्ट्रीय पुन:निर्माण होणार नाही," असं नितीन गडकरी म्हणाले.
नक्की वाचा >> '...तेव्हा सारं काही एका मिनिटात सरळ होईल'; नितीन गडकरींचं मतदारांना जाहीर आवाहन
मी 50 हजार लोकांसमोर सांगितलं की...
"मी पण निवडणुकीला उभा होतो पन्नास हजार लोकांसमोर सांगितले की ज्या विचाराशी मी कटिबद्ध आहे त्याच्याशी मी कधीही कॉम्प्रमाईज करणार नाही," असं गडकरींनी सांगितलं. "सध्या महाराष्ट्रात बरंच जातीपातीचे राजकारण सुरू आहे, मी कधीही जात-पात पाळत नाही. मी 50 हजार लोकांसमोर सांगितलं की मी जात-पात पाळणार नाही. मी जातीपातीचे राजकारण करणार नाही. जो करेगा जात की बात उसको मारुंगा कसके लाथ. जिसको देना वोट दो, जिसको देना है मत असं म्हणणं आहे. मला मत द्या, देऊ नका मी सगळ्यांची काम करणार. जे मत देणार त्यांचं पण काम करणार जे नाही देणार त्यांचा पण काम करणार," असं गडकरी म्हणाले.