Ajit Pawar On Maratha Reservation : बिहारपाठोपाठ आता महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना होण्याची चिन्हं आहेत. राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना, आता महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना होणार का, याची चर्चा सुरू झालीय. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात याबाबतचा चर्चा करू, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे.


मागासवर्गीय आयोग सर्व जातींचे सर्वेक्षण करणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनानंतर, राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी कामकाज सुरु झालंय. मात्र मागासवर्गीय आयोग केवळ मराठाच नाही तर सर्व जातींचे सर्वेक्षण करणार आहे. बिहारमध्ये अशाच पद्धतीनं जातीय जनगणना झाली होती, कोणत्या जातीची किती आकडेवारी आहे, कोणती जात किती मागास आहे याचा निष्कर्ष काढण्यात आला आणि त्यानुसार सामाजिक आरक्षण ठरवण्यात आलं. आता महाराष्ट्रात प्रत्येक जातीचं मागासलेपण तपासण्यासाठी काम सुरु झालंय.


मागासलेपण 20 निकषांवर तपासलं जाईल 


प्रत्येत जातीचं सर्वेक्षण होणार आहे. संविधानातील तरतुदीनुसार सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासलं जाणार एखाद्या जातीचं मागासलेपण 20 निकषांवर तपासलं जाईल. 2-3 महिन्यांत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वच प्रवर्गांचं सर्वेक्षण एकसमान निकषांच्या आधारावर होईल. या अहवालानुसार राज्यातील सामाजिक आरक्षण ठरण्याची शक्यता आहे.


माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक जातीचं मागासलेपण तपासण्याचा निर्णय झाला.
महाराष्ट्रातील प्रत्येक जातीच्या मागासलेपणासाठी सर्वेक्षण सुरु होतंय, बिहारच्या धर्तीवर सर्वेक्षण होणार असलं तरी आपला पॅटर्न अधिक आधुनिक आहे. सर्वेक्षणानंतर जातनिहाय अपडेटेड आकडेवारी हाती येईल. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहचायला मदत होईल.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मौन सोडलं


केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मौन सोडल आहे. तक्रार करणं आपल्या रक्तात नसल्याचं रोखठोक उत्तर अजित पवारांनी दिले.  दिवाळीआधी डेंग्यू झाल्याने 15 दिवस आजारी होतो. मात्र, राजकीय आजारपण असल्याची टीका केल्याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली. तर, दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मात्र अजित पवारांवर निशाणा साधलाय.. राज्यात अस्थिर वातावरण असताना आपल्याला डेंग्यू होतो आणि अशात आपण दिल्लीत जातात.. म्हणून लोक प्रश्न विचारतात असा टोला पटोलेंनी लगावला आहे. 


आरक्षणावरुन सध्या प्रत्येक पक्षात वाचाळविरांची संख्या वाढलीये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.. त्यामुळे वाचाळविरांनी आत्मपरीक्षण करावं असे खडेबोल अजित पवारांनी सुनावलेत. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवारांनी त्यांच्या माणसांना समज द्यावी असं आवाहन मनोज जरांगेंनी केले.