देशातील शास्त्रज्ञांच्या नजरा आता कोकणाकडे; सिंधुदुर्गात आढळले रात्री चमकणारे मशरुम
Rare Mushroom In Sindhudurg Forest: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात चमकणारी अळंबी आढळली आहे. महाराष्ट्रात चमकणाऱ्या अळंबीची पहिली नोंद झाली आहे.
उमेश परब, झी मीडिया
Bioluminescent Fungi In Sindhudurg: कोकणातील (Kokan) सौंदर्य हे पर्यटकांना नेहमीच भूरळ घालत असते. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ घालत असतो. तर, आंबोली घाटात (Amboli Ghat) सर्वात जैवविविधता आढळले. अशातच वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे या गावात एक अनोखी वस्तू सापडली आहे. वेंगुर्ल्यात चमकणारी अळंबी (मशरुम) (Glowing Mushroom) आढळली आहे. राज्यात प्रथमच चमकणाऱ्या अळंबीची नोंद झाली आहे. (Biolumi Bioluminescent Fungi In Sindhudurg)
चमकणारी अळंबी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात चमकणारी अळंबी आढळली आहे. महाराष्ट्रात चमकणाऱ्या अळंबीची पहिली नोंद ही जैवविविधतेनं नटलेल्या सिंधुदुर्गात झाली आहे. याआधी चमकणारी अळंबी ही केरळ राज्यात आढळली होती. त्यानंतर दुसरी नोंद आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली आहे.
महाराष्ट्रात दुर्मीळ अळंबीची नोंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात याआधी चमकणारी बुरशी तिलारी खोऱ्यात आढळली होती. मात्र आता सिंधुदुर्गात चमकणारी अळंबी आढळली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावात मंगेश माणगांवकर यांच्या परसबागेत दुर्मिळ बायोलुमिनिकन्स फंगी म्हणजेच रात्री चमकणारी अळंबी आढळली आहे. त्यामुळं महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच दुर्मीळ अळंबीची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा जैवविविधतेनं समृद्ध असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं आहे.
जगभरात 1000 अळंबीचे प्रकार
जगभरात 1000 अळंबीचे प्रकार आहेत त्यातील जवळपास 75 अळंबी या अंधारात चमकणाऱ्या आहेत. वैशिष्ट्य म्हणजे त्या फक्त पावसाळ्यातच प्रकाशमान होतात. प्रामुख्याने झाडाची साल आणि मृत झाडांच्या खोडावर त्यांचा अधिवास असतो. या अळंबीची वाढ होण्यासाठी पुरेसा ओलावा महत्त्वाचा असतो. होडावडे येथे आढळून आलेल्या चमकणाऱ्या अळंबीची राज्यात प्रथमच नोंद झाली आहे. त्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
चमकणाऱ्या बुरशीची नोंद
दरम्यान, यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी खोऱ्यात चमकणारी बुरशी सापडली होती. सिंधुदुर्गातील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्र परिसरात प्रकाशमान होणाऱ्या बुरशीची नोंद झाली आहे. तसंच, राज्यातील भीमाशंकर अभयारण्यातही या बुरशीची नोंद झाली आहे.