जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : 'बीटकॉईन' या डिजिटल चलनाचा वापर करून नागपुरातील अनेक गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आलीय. राज्यातील गुंतवणूकदारांचा विचार केल्यास ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूर गुन्हे शाखेनं या प्रकरणी मलेशियातील एका कंपनीच्या दोन संचालाकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बीटकॉईन' हे गेल्या काही वर्षात नव्याने उदयास आलेलं चलन... याला डिजिटल चलन म्हणूनही ओळखतात. या बीटकॉईनचं मूल्य दिवसेंदिवस वाढतं त्यामुळे चांगल्या परताव्यासाठी जगभरातील हजारो गुंतवणूकदरांनी या बीटकॉईनमध्ये गुंतवणूक केली. याच बीटकॉईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या काही गुंतवणूकदारांना मलेशियातील एका खाजगी कंपनीनं फसवणूक करीत लाखो रुपयांच्या गंडा घातलाय. फ्युचरबीट या कंपनीत खरेदी केलेले बीटकॉईन गुंतवल्यास दरदिवशी १.५ टक्के व्याज मिळण्याचे आमिष गुंतवणूकदारांना देण्यात आले होते.


या गुंतवणूकदारांत उच्च शिक्षितांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. फ्युचरबिटच्या वेबसाईटवर मिळणारा लाभ दिसत होता. मात्र, ही वेबसाईट दोन महिन्यांपूर्वी बंद झाली. फ्युचरबीट कंपनीविरोधात आतापर्यंत पोलिसांत ५० पेक्षाही जास्त गुंतवणूकदारांनी सुमारे ८० लाख रुपयांची फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. राज्यातील गुंतवणूकदारांचा विचार केल्यास ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


फ्युचरबीट कंपनी ही मलेशियातील माईक लूसी आणि रोमजी बिन अहमद यांच्या मालकीची असून यातील रामजी बिन अहमद हे बेपत्ता आहेत. अल्पावधीत तिप्पट पैसे मिळतील या लोभापायी आयुष्यभराची पुंजी अनेकांना गमवावी लागलीय.