मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊंतांविरोधात भाजप आणि काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजप माजी खासदार उदयनराजे भोसले, भाजप आमदार राम कदम यांनी आंदोलन सुरु केले आहे. तर आमदार प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राऊतांच्या इंदीरा गांधी यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरुन काँग्रेसमध्ये देखील तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  त्यामुळे राऊत यांची कालची मुलाखत वादग्रस्त ठरणार असल्याची चिन्हं दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे संजय राऊत यांनी उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा मागितला होता पुरावा. या वक्तव्याविरोधात उदयनराजे भोसले समर्थकांनी साताऱ्यात निषेध मोर्चा काढला आहे. यावेळी संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांचा निषेध गाढवांची धिंड काढून नोंदवला जात आहे. साताऱ्यातील पोवई नाक्यावर उदयनराजे समर्थक निषेध करत आहेत. 



राऊतांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केलीय. त्यासाठी त्यांनी घाटकोपर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केले आहे. तसेच संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणीही कदमांनी केली आहे.



दुसरीकडे माजी पंतप्रधान इंदीरा गांधी यांच्याबद्दलच्या वक्तव्याने त्यांनी काँग्रेस नेत्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. एकेकाळच्या अडरवर्ल्ड डॉन करीम लाला हा पठाणांच्या संघटनेचा अध्यक्ष होता. त्या निमित्तानं तो इंदिरा गांधींना पंतप्रधान या नात्यानं भेटत असे असं सांगत संजय राऊंतांनी कालच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. तर काँग्रेस नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का ? असा सवाल उपस्थित करत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. सत्तेसाठी लालची असल्यामुळेच काँग्रेस या आरोपाचं खंडन करत नसल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय. 



शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलीयं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींबाबत केलेले वक्तव्य त्वरित मागे घ्यावेत असं मिलिंद देवरा म्हणालेत. तर संजय निरुपम यांनीही राऊतांवर टीकास्त्र सोडंलय. इंदिरा गांधींविरोधात अविचारी बोलाल तर पश्चाताप कराल अशा शब्दांत निरुपम यांनी संजय राऊतांना सुनावलंय.