विशाल करोळे / औरंगाबाद : महानगर पालिकेत भाजप आणि शिवसेनेत नावावरुन जोरदार जुंपली आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा ही भाजपची नव्याने केलेली मागणी म्हणजे स्टंटबाजी आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. जो प्रस्ताव आधीच पाठवला आहे तो नव्याने कशाला, असे म्हणत महापौर नंदकुमार घोडले यांनी भाजपचे कान टोकले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजपने यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेत सादर केला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव बदलाचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन शिवसेनेला केले आहे. मात्र या प्रस्तावामुळे आता शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनने भाजपची बाजू त्यांच्यावरच पटलविण्याचा प्रयत्न केला आहे. जो प्रस्ताव आधीच पाठवला आहे, तो नव्याने कशाला, असे म्हणत भाजपची राजकीय खेळी उघड केली.



औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, हा वाद गेल्या २८ वर्षांपासून सुरु आहे, १९८८ मध्ये औरंगाबादच्या सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हा नारा दिला होता. तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेना संभाजीनगर की औरंगाबाद या मुद्द्यावरूनच निवडणूका लढत आहे. त्यात आता सत्तांतर झाले, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवेसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत, आणि यातच शिवसेनेची कोंडी कऱण्यासाठी भाजपने नवी खेळी केली. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी नव्यानं औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे, असा प्रस्ताव मांडला आहे, महापालिकेने तो सर्वसाधारण सभेत मंजूर करून मुख्यमंत्र्यांना पाठवावा आणि त्याचे स्वप्न पूर्ण करावं असा चिमटा भाजपने काढला.


शिवसेनेला या शहराचे नाव बदलायचे आहे. मात्र सध्या काँग्रेस राष्ट्रवादीत राज्यात सत्तेत असल्याने सध्या हा मुद्दा त्यांना अडचणीचा आहे, मात्र तरी सुद्धा सारवा सारव करणं शिवसेनेकडून सुरु आहे, या आधी २०१३ ला आणि त्यानंतर २०१६ ला अशा आशयाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे, त्यामुळ नव्याने प्रस्ताव पाठवण्याची गरज नसल्याचे महापौरांच म्हणणे आहे. ही सगळी स्टंटबाजी असल्याचा पलटवार शिवसेनेने केला आहे.


सर्वसामान्य नागरिकांची याबाबत वेगळी मत आहे, कुणी विरोध करतंय.. तर कुणी पहिले पायाभूत सुविधांकडे लक्ष द्या, अशी मागणी करत आहे. या शहराचे मलिक अबंर याने ठेवलेले जुने नाव म्हणजे खडकी, त्यानंतर औरंगजेब या भागाचा सुभेदार झाला आणि त्यानं या शहराच नाव औरंगाबाद केले, त्यात १९८८ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी नारा दिल्यावर शिवसेना भाजप या शहराला संभाजीनगर म्हणायला लागले, आता महापालिका निवडणूकांच्या समोर पुन्हा नामांतराचा वाद ऐरणीवर आला आहे.